इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 10:31 IST2025-12-14T10:31:28+5:302025-12-14T10:31:42+5:30
IndiGo Crisis Passengers Court: अनेक विमानांना झालेला विलंब, उड्डाणे रद्द होणे आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीमुळे कंपनीचे संकट अधिक गडद झाले आहे.

इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानांच्या वेळापत्रकात आणि सेवांमध्ये आलेल्या प्रचंड गोंधळामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. अनेक विमानांना झालेला विलंब, उड्डाणे रद्द होणे आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीमुळे कंपनीचे संकट अधिक गडद झाले आहे. आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, जवळपास ८२९ संतप्त प्रवाशांनी एकत्र येऊन भरपाईसाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी केली आहे.
प्रवाशांच्या बाजूने बोलणारे हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ग्राहक संरक्षण वकील असणाऱ्या डॉ. सुधीर शुक्ला यांनी हा मोठा दावा केला आहे. इंडिगोच्या खराब सेवांमुळे झालेल्या नुकसानीसाठी हे ८२९ प्रवासी एकत्र येत आहेत आणि लवकरच ते कंपनीविरुद्ध कोर्टात भरपाईसाठी दावा दाखल करतील.
गेल्या काही महिन्यांपासून इंडिगो विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक तास विलंबाने उड्डाण करणे, ऐनवेळी विमाने रद्द करणे आणि प्रवाशांना बोर्डिंगपासून वंचित ठेवणे यांसारख्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नाही आणि ग्राहक सेवा विभागाकडूनही सहकार्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
सूत्रांनुसार, प्रवाशांना विमानातील खराब वागणूक आणि मनमानी रद्द झालेल्या उड्डाणांमुळे झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी, यासाठी हा सामूहिक खटला दाखल केला जाणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी एकाच कंपनीविरुद्ध न्यायालयात जात असल्याने, इंडिगो एअरलाईन्सवर प्रचंड दबाव वाढणार असून, त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.