इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:34 IST2025-12-08T10:32:22+5:302025-12-08T10:34:14+5:30
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानसेवेला लागलेले ग्रहण काही सुटायला तयार नाही.

इंडिगोचे विमान संकट! दिल्ली, बेंगळुरू, चेन्नईत शेकडो फ्लाईट्स रद्द; वाचा, प्रवाशांना कधी मिळणार दिलासा?
'इंडिगो'ची विमान सेवा गेल्या सात दिवसांपासून कोलमडली आहे. दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईसह प्रमुख विमानतळांवर आज (सोमवार) एकाच दिवसात ३०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून, एअरलाइनने १० डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे.
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोच्या विमानसेवेला लागलेले ग्रहण काही सुटायला तयार नाही. गेल्या मंगळवारपासून सुरू झालेली विमानसेवा विस्कळीत होण्याची मालिका आज सातव्या दिवशीही कायम आहे. यामुळे प्रवाशांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक ठिकाणी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एकाच दिवसात इंडिगोच्या ३०० हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी 'एएनआय'ला दिली आहे. यात एकट्या दिल्ली विमानतळावर एकूण १३४ विमाने रद्द झाली. यात दिल्लीतून जाणाऱ्या ७५ आणि दिल्लीत येणाऱ्या ५९ फ्लाईट्सचा समावेश आहे. याशिवाय, बेंगळुरूत १२७ तर चेन्नई विमानतळावर ७१ विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. तर, मुंबईतूनही ९ विमान उड्डाणे रद्द झाल्याचे
विमानसेवा उशीरा प्रवाशांचे हाल!
इंडिगोची विमाने रद्द होण्यासोबतच अनेक विमानांना मोठा विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. या संकटावर मात करण्यासाठी इंडिगोच्या टीम्स सर्व संबंधित घटकांसोबत मिळून काम करत आहेत, जेणेकरून हा खोळंबा कमी करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक खास सूचना जारी केली आहे. 'इंडिगो'च्या फ्लाईट्समध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाइनकडून विमानाचा लेटेस्ट स्टेटस तपासावा,' असा महत्त्वाचा सल्ला यात देण्यात आला आहे.
दिलासा कधी? १० डिसेंबरची डेडलाईन
या मोठ्या परिचालन संकटामुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी, इंडिगो एअरलाइनने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० डिसेंबरपर्यंत विमानांचे वेळापत्रक आणि उड्डाणे सामान्य होण्याची अपेक्षा आहे. या दरम्यान, प्रवाशांच्या मदतीसाठी विमानतळावर माहिती कक्ष उपलब्ध आहेत. प्रवाशांनी वैद्यकीय मदत किंवा अन्य कोणत्याही माहितीसाठी येथे संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच, विमानतळावर ये-जा करण्यासाठी मेट्रो, बस आणि कॅबसारखे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.