...म्हणून त्यानं पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा; कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 17:59 IST2020-02-05T17:59:41+5:302020-02-05T17:59:52+5:30
आई आणि मावशीला विमानाची सफर घडवण्यासाठी केलेली युक्ती एका तरुणाला भलतीच महागात पडली आहे.

...म्हणून त्यानं पसरवली विमानात बॉम्ब असल्याची अफवा; कारण वाचून बसेल धक्का
नवी दिल्लीः आई आणि मावशीला विमानाची सफर घडवण्यासाठी केलेली युक्ती एका तरुणाला भलतीच महागात पडली आहे. आई आणि मावशीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्यानं मुंबईतल्या एका तरुणानं फेक कॉल करून विमानात बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास विलंब झाला. विशेष म्हणजे आई आणि मावशीला विमान पकडता आलेलं नसून उलट त्या तरुणालाच आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डीसीपी संजय भाटिया यांनी ही माहिती बुधवारी आयएएनएसला दिली होती. डीसीपीनं सांगितलं की, घटना मंगळवारी इंडिगो एअरलाइन्ससोबत घडली होती. आरोपीनं एअरलाइन्स ऑथोरिटीला फोन करून विमानात बॉम्ब असल्याचं सांगितलं होतं. सूचना मिळाल्यानंतर विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेले दिल्ली पोलीस आणि सीआयएसएफ(केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल)सह तपास यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
चौकशीत ही सूचना खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा बनाव मुंबईतल्या केशव नामक व्यक्तीनं रचला होता. केशवची आई आणि मावशीला इंडिगोच्या या विमानानं दिल्लीहून मुंबईला जायचं होतं. परंतु त्यांना वेळेत विमानतळावर पोहोचता येणार नसल्याचं समजल्यानंतर त्यानं ही शक्कल लढवली. विमान उड्डाणाला इतर प्रवाशांनाही उशीर झाला. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे.