नवी दिल्ली: 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये भारताने जागतिक पटलावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या परिषदेत सादर केलेल्या 'एआय इम्पॅक्ट' जाहीरनाम्यावर ८६ देशांनी आणि दोन आंतरराष्ट्रीय संघटनांनी स्वाक्षरी केली आहे. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी ही माहिती दिली.
जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांत भारतासह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, चीन, इजिप्त व इंडोनेशिया या प्रमुख देशांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले मानव-केंद्रित तंत्रज्ञानाचे व्हिजन या जाहीरनाम्याच्या निमित्ताने जगाने मान्य केले.
वैष्णव म्हणाले, एआयचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावेत, यासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर सर्व देशांचे एकमत झाले आहे."
गुंतवणुकीचा महाकुंभ
वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार एआय समिटचे फलित :
प्रचंड गुंतवणूक : पायाभूत सुविधांसाठी तब्बल २५० अब्ज डॉलर्स, तर डीप टेक स्टार्टअप्ससाठी २० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आश्वासन समिटमध्ये मिळाले आहे.
विक्रमी उपस्थिती : ५ लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली.
दिग्गजांची हजेरी : गुगलचे सुंदर पिचाई, ओपन एआयचे सॅम ऑल्टमन आणि मायक्रोसॉफ्टचे बॅड स्मिथ या टेक विश्वातील दिग्गजांनी चर्चात सहभाग नोंदविला.
वैष्णव म्हणाले की, भारत एआय गव्हर्नन्सच्या नकाशावर मुख्य केंद्र म्हणून उदयास आला आहे. सुरक्षित व विश्वासार्ह एआयसाठी सर्व देश एकत्रितपणे काम करतील.
आंदोलकांवर कारवाई
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटस्थळी शर्टलेस आंदोलन केल्याप्रकरणी अटक केलेल्या युवक काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांना दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आरोप केला की, काँग्रेसने केलेले आंदोलन हा भारताविरोधात रचलेला पूर्वनियोजित कट होता.