शांततामय सहजीवनाचे भारत हे आदर्श उदाहरण- हसन रुहानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:27 IST2018-02-16T18:23:26+5:302018-02-16T18:27:24+5:30
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. रुहानी यांनी हैदराबाद शहराला भेट दिली असून ही त्यांची दुसरी हैदराबाद भेट असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे.

शांततामय सहजीवनाचे भारत हे आदर्श उदाहरण- हसन रुहानी
हैदराबाद- इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. रुहानी यांनी हैदराबाद शहराला भेट दिली असून ही त्यांची दुसरी हैदराबाद भेट असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिली भेट आहे. हैदराबादमध्ये त्यांनी गोवळकोंडा भागामध्ये असणाऱ्या कुतुबशाही कालीन थडग्यांना भेट दिली आहे. शांततामय सहजिवनाचे भारत हे आदर्श उदाहरण असल्याचे रुहानी यांनी हैदराबादमध्ये असताना सांगितले.
हसन रुहानी या परिसरामध्ये सकाळी 9 वाजता पोहोचले, त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी त्या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले, असे पश्चिम विभागाचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. भारत विविध वंशांचे, धर्मांचे शांततामय सहजीवन असणारे संग्रहालय आहे. ही शांततेची प्रक्रिया गेली अनेक वर्षे येथे सुरू आहे. शिया, सुन्नी, सुफी, हिंदू, शीख आणि इतर धर्मीय येथे एकत्र राहतात. त्यांनी एकत्र येऊन या देशाची आणि संस्कृतीची निर्मिती केली, असे रुहानी यांनी पर्शियनमधून केलेल्या भाषणामध्ये मत व्यक्त केले. भारत आणि इराण यांच्यामध्ये असणारे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध राजकीय आणि आर्थिक संबंधांच्या पलिकडचे आहेत. या दोन्ही महान देशांच्या नागरिकांचे मूळ समान आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
आपला देश अफगाणिस्तान, इराक, सीरिया, येमेनसारख्या देशांना मदत करण्यासाठी तयार होता असेही रुहानी यावेळेस सांगितले. इराक आणि सीरियामध्ये पश्चिमेकडील देशांनी अशांतता प्रस्थापित करेपर्यंत शिया, सुन्नी, कुर्द, ख्रिश्चन एकत्र सुखनैव नांदत होते, असे सांगत त्यांनी पाश्चिमात्य देशांवर इराक व सीरियामधील हस्तक्षेपावरून टीका केली.