भारताचे अग्निपंख विसावले!
By Admin | Updated: July 28, 2015 04:54 IST2015-07-28T04:54:23+5:302015-07-28T04:54:23+5:30
देशातील तरुण पिढीच्या स्वप्नांना आपल्या अग्निपंखांचे बळ देणारे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री मेघालयमधील शिलाँग येथे हृदयाघाताने

भारताचे अग्निपंख विसावले!
शिलाँग : देशातील तरुण पिढीच्या स्वप्नांना आपल्या अग्निपंखांचे बळ देणारे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री मेघालयमधील शिलाँग येथे हृदयाघाताने निधन झाले. कलाम यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून देशाच्या वैज्ञानिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी झाली असल्याची शोकसंवेदना व्यक्त होत आहे.
८४ वर्षीय कलाम हे सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानक घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कलाम यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी गुवाहाटी येथून दिल्लीला नेण्याच्या दृष्टीने आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी आपण केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव पीबीओ वरजिरी यांनी रुग्णालयाबाहेर पत्रकारांना दिली. तत्पूर्वी खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक एम. खारकरांग यांनी कलाम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले होते.
हे वृत्त कळताच राज्यपाल व्ही. षण्मुगम, विधानसभा अध्यक्ष अबू ताहीर मंडल,
गृहमंत्री रोशन वरजिरी, मुख्य सचिव आणि डीजीपी राजीव मेहता यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.
कलाम यांच्या निधनाबद्दल शासनातर्फे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी दिली. भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांनी अतिशय सामान्य परिस्थितीत आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि ‘लोकांचा राष्ट्रपती’ म्हणून सन्मान प्राप्त केला. त्यांनी समाजाच्या सर्वच घटकाच्या, मुख्यत्वे युवकांच्या हृदयात स्थान मिळविले.
सच्चा मुस्लीम आणि एका नावाड्याचा मुलगा अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे १८ जुलै २००२ रोजी भारताच्या ११ व्या राष्ट्रपतिपदी आरूढ झाले. देशाच्या जनतेकडून सर्वाधिक आदर प्राप्त करणारे भारताचे पहिले अविवाहित राष्ट्रपती असलेले कलाम यांनी एक शास्त्रज्ञ म्हणूनही मोठे योगदान दिलेले आहे. भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाला नवे पंख मिळवून देणारे कलाम यांचे देशाच्या उपग्रह कार्यक्रम, गायडेड आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प, अण्वस्त्र कार्यक्रम आणि हलक्या लढाऊ विमान प्रकल्पातही त्यांनी योगदान दिलेले आहे.
तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे १५ आॅक्टोबर १९३१ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मद्रास तंत्रज्ञान संस्थेत भौतिकशास्त्र आणि एअरोस्पेस विषयात पदवी घेतल्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत (डीआरडीओ) रुजू झाले. तेथे त्यांनी संरक्षण आणि अंतराळ या क्षेत्रातच लक्ष दिले व नंतर ते भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात सामील झाले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण यान तंत्रज्ञानातील त्यांच्या अमूल्य योगदानामुळे त्यांची ‘मिसाईल मॅन आॅफ इंडिया’ अशी नवी ओळख निर्माण झाली. कलाम यांना भारतरत्नसह अन्य अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.
डॉ. कलाम यांचा जीवनपट...
पूर्ण नाव : आबुल पाकिर जैनुलादीन अब्दुल कलाम.
१५ आॅक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे जन्म.
प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची(विज्ञान)
व्यावसायिक : १९५४ ते ५७ मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
१९५८ साली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
१९६३ ते १९८० या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
--------------
१९८० : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
११ व १३ मे १९९८ : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.
१० जून २००२ : सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्यावतीने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डॉ. कलाम यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर केले.
१७ जुलै २००२ रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाचे १२ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
२४ जुलै २००७ राष्ट्रपतिपदावरून निवृत्त.
डॉ. कलाम यांना मिळालेले पुरस्कार
१९८१ पद्मभूषण
१९९० पद्मविभूषण
१९९७ भारतरत्न
१९९७ इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता
१९९८ वीर सावरकर पुरस्कार
२००० रामानुजम पुरस्कार
२००७ किंग चार्ल्स (दुसरा) पदक
२००७ डॉक्टर आॅफ सायन्स मानद पदवी
२००९ हूवर पदक
२0११ एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर आॅफ सायन्स
२0१२ डॉक्टर आॅफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ)
२0१४ डॉक्टर आॅफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड)
दुर्दम्य आत्मविश्वासाची ज्योत
शून्यातून सुरुवात करताना तरुण सहकाऱ्यांना हाताशी धरून अग्नीस पृथ्वी, आकाश, त्रिशूळ, नाग अशा दीर्घ पल्ल्याच्या प्रखर क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. अंतरिक्ष आणि क्षेपणास्त्र संशोधनासाठी उच्च प्रतीचे अस्सल स्वदेशी तंत्रज्ञान त्यांनी सिद्ध केले. वडिलांकडून घेतलेले मुस्लीम रीतिरिवाज, रामेश्वरम देवस्थानच्या पंडित लक्ष्मण शास्त्रींकडून मिळविलेले हिंदु धर्माचे ज्ञान आणि ख्रिश्चन संस्थेत घेतलेले औपचारिक शिक्षण या त्रिवेणी धर्मनिरपेक्ष संगमातून घडलेल्या या वैज्ञानिकाने अलौकिक कर्तबगारीने तरुण पिढ्यांच्या मनात दुर्दम्य आत्मविश्वासाची ज्योत निरंतर तेवती ठेवली.
सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा..
केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. कलाम यांच्या अंत्यसंस्काराची तारीख, वेळ आणि ठिकाण मंगळवारी जाहीर करण्यात येईल असे सरकारने सांगितले. दरम्यान, राज्यात शाळा, महाविद्यालये सुरू असतील, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतला सांगितले.