"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:44 IST2025-11-09T14:42:21+5:302025-11-09T14:44:26+5:30
१९९८ च्या पोखरण चाचण्यांपासून भारताचे अणु धोरण 'नो फर्स्ट यूज' (NFU) तत्त्वावर आधारित आहे.

"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
नवी दिल्ली - भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे. ज्या देशाला चाचणी करायची असेल त्यांनी करावी. आम्ही कुणाला रोखणार नाही. परंतु जर अशी वेळ आली तर भारतही आव्हानाला उत्तर देण्यास तयार आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. नुकतेच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्यासपीठावरून मोठा दावा केला होता. त्यात पाकिस्तान भूमिगत अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला होता. मात्र पाकिस्तानने हा दावा खोटा असल्याचं सांगितले होते. त्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ज्या देशांना चाचणी करायची असेल त्यांनी ती करावी. आम्ही कुणाला रोखणार नाही. परंतु वेळ येईल तेव्हा भारत प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहे. भारत असा कुठल्याही रिपोर्टने विचलित होत नाही. भारताचे धोरण संयम आणि तत्परता या दोन्हीवर आधारित आहे असं त्यांनी म्हटलं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतही अशीच चाचणी करेल का असा प्रश्न त्यांना विचारला असता, आधी पाहूया, ते करतायेत की नाही असं उत्तर सिंह यांनी दिले.
पाकिस्ताननं दिले स्पष्टीकरण
अमेरिकेकडून करण्यात आलेल्या दाव्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने स्पष्टीकरण दिले. आम्ही एकतर्फी चाचणी स्थगिती धोरण कायम ठेवतो. आम्ही भूतकाळात अणुचाचण्या केल्या नाहीत आणि भविष्यातही करणार नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र पाकिस्तानचा अणुकार्यक्रम पारदर्शक नाही. चीन आणि उत्तर कोरियासोबतचे त्यांचे तांत्रिक सहकार्य हे दीर्घकाळापासून जागतिक चिंतेचे कारण आहे असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारताचे धोरण 'नो फर्स्ट यूज'
१९९८ च्या पोखरण चाचण्यांपासून भारताचे अणु धोरण 'नो फर्स्ट यूज' (NFU) तत्त्वावर आधारित आहे. याचा अर्थ असा की भारत कधीही कोणत्याही देशावर प्रथम अणु हल्ला करणार नाही, परंतु हल्ला झाल्यास पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल