भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 06:42 IST2025-04-12T06:40:20+5:302025-04-12T06:42:58+5:30
Tahawwur Rana News: भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले होते.

भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार
वॉशिंग्टन/न्यूयॉर्क - भारतीयांना अशीच अद्दल घडविली पाहिजे, असे उद्गार मुंबईवरीलदहशतवादी हल्ल्यानंतर तहव्वूर राणाने डेव्हिड कोलमन हेडलीकडे काढले होते. हा हल्ला करताना मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या नऊ पाकिस्तानी दहशतवाद्यांचेही राणाने कौतुक केले होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सर्वोच्च शौर्यपदक निशान-ए-हैदर द्यायला हवे, असेही राणा म्हणाला होता.
ही माहिती अमेरिकेच्या न्याय खात्याने दिली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सहा अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. हा हल्ला करणाऱ्या १० पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब यालाच जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात अन्य नऊ दहशतवादी मारले गेले.
अमेरिकी न्याय विभागाने म्हटले आहे की, मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना न्याय मिळावा या दृष्टीनेच राणाचे भारतात प्रत्यर्पण करण्यात आले. तहव्वूर राणा व डेव्हिड कोलमन हेडली यांच्या संभाषणावर अमेरिकी गुप्तचर संस्थांनी पाळत ठेवली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राणाने हेडलीला सांगितले की, हेडलीने पाकिस्तानात लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांकडून घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने मुंबईवरील हल्ल्याचा कट आखला.
हेडलीने भारतीय अधिकाऱ्यांकडे व्हिसासाठी दोन वेळा अर्ज केला. त्यामध्ये दिलेली खोटी माहिती राणाने त्याला पुरविली.
तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. मुंबई हल्ल्याचा कट आखण्यात पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांपैकी कोणकोण सहभागी होते याची माहिती राणाच्या चौकशीतून भारतीय तपासयंत्रणांना मिळणार आहे. यूपीएच्या काळात एनआयए ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. यूपीए सरकारने राणावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून अमेरिकेला एनआयएचे पथक पाठविले होते.
- कपिल सिबल, राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ विधिज्ञ
पीडितांना आता न्याय मिळणार : अमेरिका
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण झाल्यामुळे आता त्या घटनेतील पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी शुक्रवारी सांगितले. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.