ड्रॅगनच्या ताब्यातील तिबेटवरून भारताचा उपग्रह गेला; चिनी सैन्यात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 20:17 IST2020-07-26T20:14:12+5:302020-07-26T20:17:37+5:30
भारतीय उपग्रहानं मोलाची माहिती मिळवली; चीनकडून सैन्याची जमवाजमव सुरू

ड्रॅगनच्या ताब्यातील तिबेटवरून भारताचा उपग्रह गेला; चिनी सैन्यात एकच खळबळ
नवी दिल्ली: गेल्या तीन महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरू आहेत. एका बाजूला शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला सीमावर्ती भागात चीनची आगळीक सुरू आहे. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. विशेष म्हणजे भारतानं केवळ जमिनीवरूनच नव्हे, तर अवकाशातूनही चीनला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून आता अवकाशातून चिनी सैन्यावर नजर ठेवली जात आहे.
चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून भारताना उपग्रह गेला. या उपग्रहानं चिनी सैन्याची बरीच माहिती गोळा केली. त्यानंतर चीनमध्ये एकच खळबळ उडाली. भारताच्या सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेनं (डीआरडीओ) तयार केलेला उपग्रह इमिसॅट इंटेलिजन्स इनपुट गोळा करण्याचं काम करतो. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम 'कौटिल्य' लावण्यात आली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची माहिती गोळा करता येते.
अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या तिबेटच्या वरून भारताचा उपग्रह गेल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. हा भाग पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात आहे. इस्रोनं तयार केलेल्या इमिसॅटमधील इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम शत्रूच्या जमिनीवरील ट्रान्समिशनचा वापर करून रेडिओ सिग्नलची माहिती मिळवतो. लडाखमधल्या पँगाँग त्सो येथील फिंगर ४ बद्दल भारत आणि चीनमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताचा उपग्रह तिबेटवरून गेला. त्यामुळे या भागात एकच खळबळ माजली.