नवी दिल्ली: अबुधाबीमध्ये चार महिन्यांच्या बाळाची कथित हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा भोगत असलेली भारतीय महिला शहजादी खान, हिच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीउच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या शहजादी खानला 15 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये फाशी देण्यात आली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी सांगितले की, अधिकारी शक्य ते सर्व सहकार्य करत असून, 5 मार्च रोजी महिलेवर अंत्यसंस्कार केले जातील.
यूपीच्या बांदा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या शहजादी खानच्या वडिलांनी शनिवारी (1 मार्च 2025) मुलीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते म्हणाले होते की, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी (MEA) वारंवार संपर्क साधूनही ठोस प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या मुलीची माहिती देण्याची मागणी केली होती. आज परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, UAE मधील भारतीय दूतावासाला UAE सरकारकडून 28 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत माहिती मिळाली. त्यानुसार, शहजादीला 15 फेब्रुवारी 2025 रोजीच फाशी देण्यात आली. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी या घटनेला 'अत्यंत दुर्दैवी' म्हटले.
तुरुंगातून शेवटचा फोन
शहजादीला 10 फेब्रुवारी 2023 रोजी अबू धाबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते, तर 31 जुलै 2023 रोजी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तिला अल वाथबा तुरुंगात ठेवण्यात आले होते. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, 14 फेब्रुवारीला तुरुंगातून कुटुंबीयांना शहजादीचा शेवटचा फोन आला होता. फोनवरुन तिने सांगितले होते की, तिला एक-दोन दिवसांत फाशी दिली जाऊ शकते, हा माझा शेवटचा कॉल आहे. यानंतर कुटुंबीयांना तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
शहजादीला फाशी का झाली?
शहजादी खानला एका चार महिन्यांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. डिसेंबर 2021 मध्ये व्हिसा घेऊन ती अबू धाबीला गेली आणि ऑगस्ट 2022 मध्ये एका कुटुंबात मुलाची काळजी घेण्यासाठी तिची नियुक्ती झाली. 7 डिसेंबर 2022 रोजी मुलाचे लसीकरण करण्यात आले, परंतु त्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्याची शिफारस असूनही, पालकांनी ती नाकारली आणि तपास थांबवण्यासाठी संमतीपत्रावर स्वाक्षरी केली.
शेहजादी खानवर बाळाचा मृत्यू झाल्याबद्दल खटला भरण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये शहजादी खानचे एक व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले, ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येची कबुली दिली होती. मात्र, दबावाखाली ही कबुली दिल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. 10 फेब्रुवारी 2023 रोजी शहजादीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि 31 जुलै 2023 रोजी तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.