Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:50 IST2025-08-19T12:49:40+5:302025-08-19T12:50:55+5:30
Indian Railway New Rules: प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर, दंड भरावा लागणार आहे.

Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
विमानाप्रमाणेच आता रेल्वे प्रवासातही सामानाचे वजन तपासले जाणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी सामानाचे वजन नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला असून, काही प्रमुख स्थानकांवर या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागू शकतो.
रेल्वेच्या नियमानुसार, प्रत्येक श्रेणीसाठी मोफत सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
श्रेणी | वजन मर्यादा |
प्रथम श्रेणी | ७० किलो |
एसी सेकंड क्लास | ५० किलो |
थर्ड एसी आणि स्लीपर | ४० किलो |
जनरल | ३५ किलो |
मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास...
प्रवाशांकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल आणि त्यांनी ते बुक केले नसेल, तर त्यांना दंड भरावा लागेल. रेल्वे प्रवाशांना त्यांच्यासोबत १० किलोपर्यंत अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची परवानगी असेल, परंतु त्यापेक्षा जास्त वजनासाठी सामान बुक करणे आवश्यक आहे.
रेल्वे अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी जास्त सामान घेऊन प्रवास करतात, ज्यामुळे रेल्वेच्या डब्यात बसताना आणि चालताना अडथळे निर्माण होतात. यामुळे प्रवाशांना आणि इतरांची गैरसोय होते. तसेच, अतिरिक्त सामान सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकते.
रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधा
सध्या उत्तर रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेने लखनौ आणि प्रयागराज विभागातील प्रमुख स्थानकांवरून ही नवीन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगढ जंक्शन यांसारख्या मोठ्या स्थानकांचा समावेश आहे. विमानतळांप्रमाणेच, रेल्वे स्थानकांवरही सामान बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या सामानाचे वजन तपासून घेणे महत्त्वाचे असेल.