Indian Railway: देशात आधीच भीषण कोळसा संकट, त्यानंतर आता सरकारने 1100 ट्रेन रद्द केल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 14:42 IST2022-05-05T14:42:12+5:302022-05-05T14:42:24+5:30
Indian Railway: देशात सध्या भीषण कोळसा आणि वीज संकट उद्भवले असताना सरकारने 1100 ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

Indian Railway: देशात आधीच भीषण कोळसा संकट, त्यानंतर आता सरकारने 1100 ट्रेन रद्द केल्या
Indian Railway: भारतावर भीषण कोळसा संकट उद्भवले आहे. या कोळसा संकटामुळे देशातील वीजेच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील 20 दिवस देशभरातील किमान 1100 गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर प्रवाशांसह व्यापारी वर्गही नाराज झाला आहे.
देशातील अनेक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळसा संकटाचा सामना करावा लागत आहे. याला सामोरे जाण्यासाठी आणि कोळशाचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे 15 टक्के अतिरिक्त कोळशाची वाहतूक करत आहे. यामुळे रेल्वेने पुढील 20 दिवस सुमारे 1100 प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर या दोन्ही गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या 500 फेऱ्या, तर पॅसेंजर गाड्यांच्या 580 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोळशाचा पुरवठा वाढवण्यासाठी गाड्या थांबवल्या
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, औष्णिक वीज केंद्राला कोळसा पुरवणार्या मालगाड्यांना मार्ग देण्यासाठी प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील एक महिन्यासाठी रेल्वेने 670 पॅसेंजर गाड्या आधीच रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. विशेषतः छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड यांसारख्या कोळसा उत्पादक राज्यांतून ये-जा करणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
अनेक राज्यात विजेचे संकट
देशात यंदा कडक उन्हाचा सामना करावा लागत असून त्यामुळे एप्रिल महिन्यापासून विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा वापरही वाढला आहे. पण, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा यासह अनेक राज्यांमध्ये कोळसा संकटामुळे विजेची समस्या निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.