रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:04 IST2025-10-27T06:53:18+5:302025-10-27T07:04:30+5:30
आपल्याला हा फटका बसू नये म्हणून कंपनीने कायदेशीर मत मागवले आहे.

रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
नवी दिल्ली : रशियाच्या तेल कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध घातल्यानंतर ओएनजीसी विदेशी लिमिटेड कंपनी न्यायालयीन लढाईच्या तयारीत असल्याचे समजते. रशियाने युक्रेन युद्ध थांबावावे म्हणून अमेरिकेने रोसनेफ्ट व लुकऑइल या दोन रशियन कंपन्यांवर निर्बंध घातले होते. या निर्बंधांमुळे या कंपन्यांमध्ये ज्या उपकंपन्यांची हिस्सेदारी आहे, त्यांनाही याचा फटका बसला आहे.
या दोन कंपन्यांमध्ये ओएनजीसी व अन्य भारतीय तेलकंपन्यांची मिळून ४९.९ टक्के इतकी हिस्सेदारी आहे. आपल्याला हा फटका बसू नये म्हणून कंपनीने कायदेशीर मत मागवले आहे.
रोसनेफ्टमध्ये एक उपकंपनी सीजेएससी व्हँकोरनेफ्टची हिस्सेदारी आहे. यात ओएनजीसीची हिस्सेदारी सुमारे २६ टक्के इतकी असून इंडियन ऑइल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोरिसोर्सेस अशा कंपन्यांची एकूण हिस्सेदारी २३.९% इतकी आहे.
भारत रशियन तेल खरेदी पूर्णपणे थांबवत आहे
भारत रशियन तेल खरेदी ‘पूर्णपणे कमी’ करत आहे, तर चीन ‘मोठ्या प्रमाणात कपात’ करणार आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. मलेशियाकडे रवाना होताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवण्याबाबतही ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला. ट्रम्प म्हणाले की, रशिया–युक्रेन संघर्ष सुटेल असे वाटले होते, पण ते कठीण झाले आहे. भारत–पाकिस्तान वादापेक्षा हा संघर्ष सोपा असेल, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. झेलेन्स्की आणि पुतिन यांच्यात प्रचंड वैर आहे, असे ट्रम्प म्हणाले.