Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या भयानक हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाल्याचे म्हटलं जात आहे. प्रशासनाकडून १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मृतांमध्ये जखमींमध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचे म्हटलं. दुर्दैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
पहलगाममधील बेसरन परिसरात हजारोंच्या संख्येने असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारत पर्यटकांची हत्या करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत १६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. विजय नरवाल २६ वर्षांचे होते आणि कोची येथे तैनात होते. रजेवर असताना पहलगाम हल्ल्यात विनय नरवाल शहीद झाले आहेत. ते मूळचे हरियाणाचे रहिवासी होते आणि १६ एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले होते.
लग्नाच्या सात दिवसानंतरच विनय नरवाल यांची पहलगाममध्ये हत्या करण्यात आली आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी विनय नरवाल हे पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते. मात्र दहशतवाद्यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली. विनय नरवाल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे.
कुटुंबासमोरच आयबी अधिकाऱ्याची हत्या
दरम्यान या हल्ल्यात हैदराबाद येथील केंद्रीय गुप्तचर संघटनेतील एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. तेलंगणातील गुप्तचर विभागातील अधिकारी मनीष रंजन यांची काश्मीर दहशतवादी हल्ल्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आयबी अधिकारी मनीष रंजन, त्यांच्या कुटुंबासह काश्मीरमध्ये गेले होते. जेव्हा मनीष रंजन यांच्या कुटुंबाला गोळीबाराचा आवाज आला तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांना त्यांच्या विरुद्ध दिशेने पळण्यास सांगितले. त्याचवेळी मनीष रंजन यांना गोळी घालून ठार मारण्यात आले. त्यांच्या पत्नीने फोनवरून पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला फोन लागला आणि त्यानंतर त्यांचा फोन कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याचे सांगण्यात आले.