भारतीय संगीतातच समाधीवस्थेची गुणवत्ता
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:25+5:302015-02-14T23:50:25+5:30
- गायक शौनक अभिषेकी : शास्त्रीय संगीताला पर्याय नाही

भारतीय संगीतातच समाधीवस्थेची गुणवत्ता
- ायक शौनक अभिषेकी : शास्त्रीय संगीताला पर्याय नाही ताराचंद राय : सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी त्यांचे पिता गायक पं. जितेंद्र अभिषेकी यांची परंपरा समोर नेणारे गायक आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, भावसंगीत आदी सर्वच प्रकारात प्रभुत्व असलेल्या शौनकजींच्या मते भारतीय संगीतातच संपूर्ण जगाला समाधीवस्थेपर्यंत नेण्याची शक्ती आहे. भारतीय संगीत संपूर्ण जगात लोकप्रिय होते आहे. विदेशात भारतीय संगीताचे कार्यक्रम वाढले आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृतीकडेही जगाचा ओढा वाढला असल्याचे मत त्यांनी लोकमतजवळ व्यक्त केले. भारतात आतापर्यंत सुगम गायनाकडेच लोक वळत होते कारण शास्त्रीय संगीतात व्यावसायिक गायक होणे बेभरवशाचे होते. पण आता तशी स्थिती नाही त्यामुळे अनेक लोक शास्त्रीय संगीताकडे वळले आहेत. पालकही मुलांना शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. शास्त्रीय संगीत शिकणे तसेही आवश्यक आहे कारण त्यातूनच आपल्या परंपरेचे संचित आपल्यापर्यंत पोहोचते. वडील. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी जागतिक स्तरावरच्या कुठल्याही संगीताचा दुस्वास केला नाही. त्यापेक्षा त्यांनी मलाही वेगवेगळे संगीत ऐकण्याचा आणि संगीताकडे व्यापकतेने पाहण्याचा दृष्टिकोन दिला. याशिवाय केवळ शास्त्रीयच नव्हे तर भक्तीसंगीत, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय संगीत हे संगीतच आहे. त्यामुळे त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही, हा संस्कार त्यांनी मला दिला. त्यामुळेच मी वेगवेगळ्या प्रकारात सादरीकरण करीत असतो. अनेक संगीत दिग्दर्शकांच्या हाताखाली मी चित्रपटांसाठी अभंग, भजन गायन केले आहे. शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटगीते मिळालीत तर ती देखील गायला मी तयार असतो. विदेशात अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणे होते आणि तेथे कलावंतांना खूप प्रतिष्ठा मिळते. पण भारतात मात्र त्या प्रमाणात प्रतिष्ठा मिळत नाही. भारतात जर कलावंतांना प्रतिष्ठा मिळाली तर प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने संगीत शिकावे, असे वाटेल. यासाठी प्रत्येक वाहिनीवरुन शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रसारित झाले पाहिजे. वडिलांनी आग्रा घराण्यासह जयपूर घराण्याचीही गायकी आत्मसात केली होती. त्यामुळे मीही दोन्ही घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला आणि याची संमिश्रता माझ्या गायनात आणून गायन अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न मी करीत असतो. लोकांना सध्या ते आवडते आहे, याचे समाधान वाटते, असे ते म्हणाले.