‘भारताची कन्या’ खामोशच!
By Admin | Updated: March 5, 2015 01:10 IST2015-03-05T01:10:06+5:302015-03-05T01:10:06+5:30
दिल्लीच्या एका न्यायालयाने १६ डिसेंबरच्या निर्भया बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या मुलाखत प्रसारणावरील बंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवली आहे.

‘भारताची कन्या’ खामोशच!
नवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने १६ डिसेंबरच्या निर्भया बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या मुलाखत प्रसारणावरील बंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवली आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खनगवाल यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांद्वारे दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेला बंदी आदेश सादर करण्यात आल्यानंतर उपरोक्त निर्देश दिले. कोणीही ही मुलाखत प्रसारित केल्यास पोलीस आवश्यक ती कारवाई करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली पोलिसांनी काल याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर माध्यमांद्वारे या मुलाखतीचे प्रसारण, प्रकाशनावर न्यायालयाकडून बंदी आदेश मिळविला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानीत धावत्या बसमध्ये २३ वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला बसमधून फेकून दिले होते. ही बस मुकेशसिंग चालवित होता.
माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यापूर्वीच्या संपुआ सरकारनेच बीबीसीच्या निर्मात्यास १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशच्या मुलाखतीची परवानगी दिली होती. गृहमंत्रालयाने यावर आक्षेप घेतला असून माहिती प्रसारण मंत्रालयानेही सूचना जारी केली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काय आहे माहितीपटात
च्बीबीसी वाहिनीची निर्माती आणि दिग्दर्शक लेस्ली उडविन यांनी १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर हा माहितपट तयार केला आहे. या माहितीपटासाठी त्यांनी तिहार कारागृहात जाऊन मुकेशसिंग नामक आरोपीची मुलाखत घेतली.
च्या मुलाखतीत मुलीचा प्रतिकारच तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, असे निर्लज्जपणाचा कळस गाठणारे विधान या आरोपीने केले आहे. मृत तरुणीच्या नातेवाईकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
ब्रिटिश दिग्दर्शिकेचे मोदींना हस्तक्षेपाचे आवाहन
च्लंडन : निर्भया प्रकरणावरील माहितीपटाचे प्रदर्शन रोखण्यात आल्यानंतर याच्या ब्रिटिश दिग्दर्शिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले असल्याचे वृत्त ‘गार्डियन’ने दिले आहे. उडविन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भारताची कन्या’(इंडियाज् डॉटर) हा माहितीपट रविवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटावरून वादळ उठल्यानंतर भारतीय प्रशासनाने त्याचे देशातील प्रदर्शन रोखले असून, विदेशातील प्रदर्शन रोखण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.