पहलगामच्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' करून दहशतवाद्यांची तळं नष्ट केली. मात्र, या मोहिमेनंतर पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानाकडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे हल्ले भारतीय सेनेने हवेतच परतवून लावले आहेत. ८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानने पश्चिम सीमा आणि जम्मू-काश्मीर भागात ड्रोन हल्ले केले. मात्र, भारताने ते परतवून लावले.
जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली 'आकाश'ने पाकिस्तानचे हे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले. भारताकडे अतिशय ताकदवान हवाई संरक्षण प्रणाली आहेत. यात एक आहे 'एस ४००' तर दुसरी 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या दोघांपुढे पाकिस्तानच्या एकाही ड्रोन किंवा क्षेपणास्त्राचा टिकाव लागला नाही. आकाश क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे जेएफ-१७ हे विमान देखील पाडले आहे.
भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दल दोघांकडेही ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी आता पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आली आहे.
का खास आहे 'आकाश'?आकाश ही एक कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. जी हवाई हल्ल्यांपासून संवेदनशील भागांचे आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण करते. आकाश मिसाईल एकाच वेळी ग्रुप मोड किंवा ऑटोनॉमस मोडमध्ये अनेक लक्ष्यांवर हल्ला करू शकते. संपूर्ण शस्त्र प्रणाली मोबाईल प्लॅटफॉर्मवर कॉन्फिगर केलेली आहे. 'आकाश प्राईम' ही आकाश क्षेपणास्त्राची नवीन आवृत्ती आहे. २७ सप्टेंबर २०२१ रोजी ओडिशातील चांदीपूर येथे झालेल्या चाचणीत या क्षेपणास्त्राने पहिल्याच उड्डाणात शत्रूच्या विमानाच्या मॉडेलनुसार बनवलेल्या मानवरहित हवाई लक्ष्याला रोखले आणि नष्ट केले. आकाश प्राइममध्ये स्वदेशी सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर आहे.
भारताचे 'आकाश-१' हे २५ ते ४५ किमी अंतरावर आणि १८ किमी उंचीवर लक्ष्य भेदू शकते. त्याचप्रमाणे, त्याची अपग्रेडेड आवृत्ती 'आकाश-एनजी'ची रेंज ७०-८० किमी आहे. त्याचा अंदाजे ३,५०० किमी/ताशी सुपरसॉनिक वेग शत्रूला हादरवून टाकतो. ही मिसाईल प्रणाली स्मार्ट रडारने सुसज्ज आहे, जी १५० किमी अंतरापर्यंत ६४ लक्ष्ये शोधू शकते आणि एकाच वेळी १२ क्षेपणास्त्रांना लक्ष्य करू शकते.