Indian Army: आधी लग्न जवानाचे! मुहूर्तावर पोहोचणार नाही म्हणून बीएसएफने LoC वर हेलिकॉप्टर पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:09 IST2022-04-28T18:08:45+5:302022-04-28T18:09:03+5:30
Indian Army: लग्नाची सर्व तयारी झाली होती, पाहुण्यारावळ्यांना निमंत्रणे गेली होती. परंतू आपला मुलगा लग्नाला पोहोचू शकणार नाही, अशी चिंता जवानाच्या आई-वडिलांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.

Indian Army: आधी लग्न जवानाचे! मुहूर्तावर पोहोचणार नाही म्हणून बीएसएफने LoC वर हेलिकॉप्टर पाठविले
सीमा सुरक्षा दलाने जम्मू काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेल्या एका जवानासाठी हेलिकॉप्टर पाठविले होते. या जवानाचे लग्न होते, परंतू बर्फवृष्टीमुळे तो चौकीतच अडकला होता. यामुळे बीएसएफने विशेष परवानगी देत हेलिकॉप्टरने त्याला जम्मूमध्ये आणले.
नारायण बेहरा हा तीस वर्षीय जवान माछिल सेक्टरमधील उंचावरील एका चौकीवर तैनात होता. त्याचे तिथून जवळपास २५०० किमी अंतरावरील गावी लग्न होते. परंतू तो लग्नाला घरी पोहोचू शकणार नव्हता. त्याचे येत्या २ मे रोजी लग्न आहे. जवानांची ही चौकी बर्फाने झाकलेली आहे. काश्मीर घाटीतून तिकडे येण्या-जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. यामुळे बीएसएफसमोर एकच पर्याय उरला होता, तो म्हणजे एअरलिफ्ट करण्याचा.
बेहरा यांच्या आई-वडिलांनी त्याच्या युनिटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आपली चिंता व्यक्त केली. लग्नाची सर्व तयारी झाली होती, पाहुण्यारावळ्यांना निमंत्रणे गेली होती. परंतू आपला मुलगा लग्नाला पोहोचू शकणार नाही, अशी चिंता त्यांनी कमांडरकडे व्यक्त केली होती. यानंतर बीएसएफने सारी सुत्रे हलविली. याबाबत बीएसएफचे महानिरीक्षक (काश्मीर सीमा) राजा बाबू सिंह यांच्या कानावर ही बाब घालण्यात आली. त्यांनी तातडीने चिता हे हेलिक़ॉप्टर त्या चौकीवर पाठविण्याचे आदेश दिले.
गुरुवारी रात्रीच हेलिकॉप्टर त्या चौकीच्या दिशेने झेपावले आणि पहाटेच्या सुमारास श्रीनगर परतले. जवानाच्या लग्नासाठी हेलिकॉ़प्टर पाठविल्याची तशी ही पहिलीच घटना आहे, परंतू सैनिकांचे कल्याण आपले पहिली आणि महत्वाची प्राथमिकता आहे, असा संदेश बीएसएफने दिला. केंद्रीय गृह मंत्रालयाने CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) कर्मचाऱ्यांना अनेक मार्गांवर विमानाने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. इंडिगो ही सेवा देणार आहे.