Indian Army: चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे जवानांनी रक्तदान करून वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:52 IST2022-08-25T14:50:14+5:302022-08-25T14:52:08+5:30
Indian Army: भारतीय लष्कराने मानवतेचं एक वेगळचं उदाहरण प्रस्तुत केलं आहे. चकमकीत गोळी लागल्याने एक पाकिस्तानी दहशतवादी गंभीर जखमी झाला होता. त्याचे प्राण वाचणे जवळपास अशक्य झाले होते. या परिस्थितीत भारतीय लष्कराच्या जवानांनी आपलं रक्त देऊन या दहशतवाद्याचे प्राण वाचवले.

Indian Army: चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे जवानांनी रक्तदान करून वाचवले प्राण
श्रीनगर - मानवतावादी कार्यांसाठी भारतीय लष्कर हे नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. आताही भारतीय लष्कराने मानवतेचं एक वेगळचं उदाहरण प्रस्तुत केलं आहे. चकमकीत गोळी लागल्याने एक पाकिस्तानी दहशतवादी गंभीर जखमी झाला होता. त्याचे प्राण वाचणे जवळपास अशक्य झाले होते. या परिस्थितीत भारतीय लष्कराच्या जवानांनी आपलं रक्त देऊन या दहशतवाद्याचे प्राण वाचवले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार जवानांनी तीन बाटल्या रक्त दिले, त्यामुळे त्या दहशतवाद्याचे प्राण वाचले.
जम्मूमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये एलओसी पार करून काही दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा भारतीय लष्कराच्या जवानांना पाहून ते पळू लागले. तेव्हा झालेल्या चकमकीत जखमी झालेल्या दहशतवाद्याला लष्कराने पकडले.
पकडलेल्या दहशतवाद्याचं नाव तबरक हुसैन आहे. तो पाकव्याप्त काश्मीरमधील कोठली येथील सब्जकोट गावातील रहिवासी आहे. त्याला रविवारी नौशेरा सेक्टरमधून पकडण्यात आले होते. हुसैन हा भारतामध्ये आत्मघाती हल्ला करण्यासाठी आला होता. त्याला पकडले गेले नसते, तर मोटी दुर्घटना घडली असती.
ब्रिगेडियर राजीव नायर यांनी सांगितले की, या दहशतवाद्याच्या जांघेत आणि खांद्यावर दोन गोळ्या लागल्या होत्या. त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यानंतर जवानांनी तीन बाटल्या रक्त दिले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा दहशतवादी सध्या आयसीयूमध्ये आहे. तसेच त्याची प्रकृती स्थिर आहे.