काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:28 IST2025-12-18T13:28:19+5:302025-12-18T13:28:51+5:30
Indian Army in Kashmir Tanks deployment: लष्कराच्या उत्तर कमांडने या हालचालीवर विशेष लक्ष ठेवले असून, खोऱ्यातील संवेदनशील भागात ही शस्त्रास्त्रे तैनात केली जाणार आहेत

काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने एक महत्त्वाची मोहीम राबवली आहे. गुरुवारी एक विशेष लष्करी ट्रेन अवजड रणगाडे, तोफा आणि आधुनिक शस्त्रास्त्रांसह काश्मीर खोऱ्यात दाखल झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या संभाव्य कारवाया आणि थंडीच्या काळात वाढलेला घुसखोरीचा धोका लक्षात घेता ही तैनात महत्त्वाची मानली जात आहे.
शस्त्रास्त्रांची मोठी रवानगी या लष्करी ट्रेनमधून भारतीय लष्कराचे मुख्य रणगाडे, चिलखती वाहने आणि तोफखाना काश्मीरमध्ये नेण्यात आला आहे. लष्कराच्या उत्तर कमांडने या हालचालीवर विशेष लक्ष ठेवले असून, खोऱ्यातील संवेदनशील भागात ही शस्त्रास्त्रे तैनात केली जाणार आहेत. रेल्वे मार्गाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर लष्करी साधनसामग्री पोहोचवण्याची ही एक महत्त्वाची लष्करी कवायत आहे.
काय आहे उद्देश?
पाकिस्तान, चीनसारख्या देशाने भारतावर हल्ला केला तर कमी वेळेत रणगाडे, शस्त्रास्त्रे त्या भागात पोहोचविणे कठीण होणार होते. रेल्वेने आता ते सोपे होणार आहे. या शस्त्रास्त्रांची तैनाती करण्यात आता सैन्याला फार कमी वेळ लागणार आहे. याची वाहतूक करणे सोपे झाले आहे.
यामुळे लडाख आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची पकड मजबूत करणे; खोऱ्यात सुरू असलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमांना अधिक बळ देणे; बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी दुर्गम भागात रसद आणि शस्त्रास्त्रे पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.