Indian Air Strike on Pakistan: 'ते' ११ दिवस अथकपणे झटले अन् आज जिंकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 17:39 IST2019-02-26T16:30:20+5:302019-02-26T17:39:29+5:30
भारताच्या हवाई हल्ल्यानं जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं

Indian Air Strike on Pakistan: 'ते' ११ दिवस अथकपणे झटले अन् आज जिंकले!
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडण्यात भारतीय हवाई दलाला यश आलं. हवाई दलानं मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान केलेल्या कारवाईत जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर आणि मेहुणा युसूफ अजहर खात्मा झाला. हवाई दलानं मध्यरात्री केलेली कारवाई अतिशय यशस्वी ठरली. गेल्या अकरा दिवसांपासून या कारवाईची तयारी सुरू होती.
कशा प्रकारे सुरू होती तयारी-
15 फेब्रुवारी- हवाई दलानं हल्ल्याचा प्रस्ताव सरकारला दिला
16 ते 20 फेब्रुवारी- हवाई दल आणि लष्करानं ड्रोननं नियंत्रण रेषेची टेहळणी केली
20 ते 22 फेब्रुवारी- हवाई दल आणि गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्याचं लक्ष्य निश्चित केलं
21 फेब्रुवारी- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांच्यासमोर हवाई हल्ल्याचा पर्याय ठेवण्यात आला
22 फेब्रुवारी- 12 मिराज 2000 विमानं कारवाईसाठी निश्चित करण्यात आली
24 फेब्रुवारी- भटिंडा, आग्रा विमानतळांवर विमानांनी पूर्वतयारी केली
26 फेब्रुवारी- बालाकोट, चकोठी, मुजफ्फराबादमध्ये मध्यरात्री 3 ते 3.30 दरम्यान हल्ला
हल्ल्यासाठी बालाकोटची निवड का केली?
भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदच्या दृष्टीने यातील बालाकोटचं महत्त्व फार मोठं आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरची कंदहार प्रकरण घडलं. त्यावेळी भारताला अजहरची सुटका करावी लागली. त्यानंतर अजहरने त्याचा मोठा तळ बालाकोटमध्ये उभारला. भारतीय हवाई दलाने याच तळाला लक्ष्य करत जैशला मोठा दणका दिला.
भारताने कारवाईसाठी बालाकोटची निवड करण्यामागे आणखी एक कारण आहे. बालाकोट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष म्हणजे हा भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत नाही. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तुन प्रांतात येतो. भारतीय हवाई दलाची विमानं काही अंतर आत आली, असा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला. मात्र या दाव्यात अजिबात तथ्य नाही. कारण बालाकोट भारतीय सीमेपासून 40 किलोमीटर दूर आहे.