India will get the best Apache and M60 Romeo helicopters from us kkg | सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताला मिळणार

सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताला मिळणार

नवी दिल्ली : तीन अब्ज डॉलरच्या करारावर शिक्कामोर्तब करून भारत व अमेरिकेने संरक्षण सहकार्य वृद्धिंगत केले. या करारानुसार अमेरिकेकडून भारत जगातील सर्वोत्तम अपाचे व एम-६० रोमिओ हेलिकॉप्टर, तसेच अत्याधुनिक लष्करी उपकरणे खरेदी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापार संबंध, ऊर्जा सहकार्य व दहशतवादासह सामरिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दोन्ही देश कट्टर इस्लामिक दहशतवादापासून आपल्या जनतेचे रक्षण करण्यास बांधील असल्याचे ठामपणे सांगितले. पाकिस्तानातील सक्रिय दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही प्रभावीपणे काम करीत आहोत. त्यासाठी आमच्यात संरक्षण सहकार्य असेल, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, या करारामुळे संयुक्त संरक्षण क्षमता वाढेल. मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत मुख्य भर परस्पर द्विपक्षीय आर्थिक संबंधांवर होता.

सर्वंकष व्यापार करारासाठी प्रगती झाली आहे. या कराराला आम्ही अंतिम स्वरूप देऊ, अशी आशा आहे. आपण सूत्रे हाती घेतल्यानंतर भारताला होणारी निर्यात ६० टक्के वाढली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून दोन देशांत आज तीन अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार झाले. ऊर्जा क्षेत्रातील एका करारासह तीन सहमती करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या. भारत व अमेरिका यांनी परस्परसंबंध जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचे ठरवले आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, दोन देशांतील संबंध फक्त सरकारच्या पातळीवर नसून, ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. अमली पदार्थांच्या वाहतुकीला अटकाव करण्यासाठी नव्या व्यवस्थेवर आम्ही सहमत आहोत.

मोदींवर आहे लोकांचे प्रेम - डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प यांनी त्यावर भारतातील गेले दोन दिवस खूपच आश्चर्यकारक होते अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. ते मोदी यांना उद्देशून म्हणाले : ही भेट माझ्यासाठी मोठा सन्मान होता. स्टेडियममधील सव्वालाख लोक माझ्यापेक्षा तुमच्यासाठी आले होते. मी तुमचे नाव घेताच लोक जयघोष करायचे. लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे.

Web Title: India will get the best Apache and M60 Romeo helicopters from us kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.