भारत हिंदू राष्ट्र होईल!
By Admin | Updated: July 25, 2014 02:09 IST2014-07-25T02:09:29+5:302014-07-25T02:09:29+5:30
भारत हे हिंदू राष्ट्र बनेल व त्यादृष्टीने मोदी हे काम करतील, असे आपल्याला वाटत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

भारत हिंदू राष्ट्र होईल!
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हे हिंदू राष्ट्र होईल, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष असलेले र्पीकर सरकारमधील सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. हा विषय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा बनला आहे.
मोदी हे पंतप्रधान बनल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजपाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडला होता. त्या ठरावाच्या अनुषंगाने बोलताना मंत्री ढवळीकर व इतर मंत्री-आमदारांनीही मोदी यांचे अभिनंदन केले. मंत्री ढवळीकर हे तर केवळ अभिनंदन करूनच थांबले नाहीत. भारत हे हिंदू राष्ट्र बनेल व त्यादृष्टीने मोदी हे काम करतील, असे आपल्याला वाटत असल्याचे ढवळीकर म्हणाले.
अलीकडेच मंत्री दीपक ढवळीकर यांचे बंधू असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी पब संस्कृती, मिनी स्कर्ट व बिकिनीबाबतचा वाद निर्माण केला. बिकिनी घालून गोव्यात फिरण्यास पर्यटकांना बंदी हवी, असे विधान सुदिन ढवळीकर यांनी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्यांचे बंधू दीपक ढवळीकर यांनी मोदी हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणतील, असे विधान केल्याने तोही वादाचा विषय बनू शकतो.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याच ठरावावर बोलताना, आपण तसेच मोदी हेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आल्याबाबत अभिमान वाटतो, असे सांगितले.
मोदी हे जातीयवादी तसेच विभाजनवादी आहेत, अशी टीका काही जण करत होते. ती चुकीची आहे. आरएसएस ही राष्ट्रप्रेमी नागरिकांची संघटना आहे व सर्वानी मान्य करायला हवे. संघ म्हणजे काही दहशतवादी संघटना नव्हे, असे पार्सेकर म्हणाले. (प्रतिनिधी)