पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:01 IST2025-04-29T09:01:02+5:302025-04-29T09:01:21+5:30
India Vs Pakistan War: सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले.

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
भारत-पाकिस्तानमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून प्रचंड तणाव निर्माण झालेला असताना एलओसीवर एक मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी पकडले आहे. शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम साहू गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले. अद्याप पाकिस्तानच्या तावडीतून त्यांना सोडविण्यात यश आलेले नाही. यामुळे पश्चिम बंगालहून साहू यांची गर्भवती पत्नी फिरोजपूरला पोहोचली आहे.
रजनी साहू या गर्भवती आहेत, पतीला सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलली जात आहेत हे जाणून घेण्यासाठी त्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आल्या आहेत. सैन्यातील सर्वजण आश्वासन देत आहेत. परंतू, बुधवारी त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्यापासून काहीच प्रगती झालेली नाही. काय चर्चा सुरु आहे हे जाणण्यासाठी मी इथे आले असल्याचे त्या म्हणाल्या. जर बीएसएफच्या अधिकाऱ्यांकडून संतोषजनक माहिती नाही मिळाली तर मी दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालय आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कसे गेले पाकिस्तानच्या ताब्यात...
सीमेजवळ काम करणाऱ्या शोतकऱ्यांच्या एका गटाचे संरक्षण करण्यासाठी साहू यांची ड्युटी लागली होती. यावेळी ते आराम करण्यासाठी जवळच्याच झाडाखाली गेले. यावेळी त्यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले, असे बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. साहू हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.
साहुला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय आणि पाकिस्तानी सीमा दलांनी "ध्वज बैठक" आयोजित केली होती परंतु त्याच्या कुटुंबाला अधिक माहिती देण्यात आली नाही. रविवारपर्यंत काहीच माहिती न मिळाल्याने साहु यांची पत्नी मुलगा, भाऊ आणि बहीणीसोबत विमानाने चंदीगढला आले, यानंतर फिरोजपूरला जात बीएसएफच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.