पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर दररोज होणारी बिटींग रिट्रीट सेरेमनी स्थगित करण्यात आली होती. ती पुन्हा उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. पाकिस्तान सीमेवरील पंजाबमध्ये येणाऱ्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ बुधवारपासून सुरु केला जाणार असल्याचे बीएसएफने म्हटले आहे.
मंगळवारी म्हणजे आजही बिटींग रिट्रीट सेरेमनी होणार आहे, परंतू ती फक्त प्रसारमाध्यमांसाठी खुली असणार आहे. बुधवारपासून सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी येऊ शकतात, असे जालंधर येथील मुख्यालय असलेल्या पंजाब फ्रंटियरने सांगितले आहे. या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ६ वाजता असणार आहे.
अटारी, हुसैनीवाला आणि सदकी येथे हा कार्यक्रम होणार आहे. असे असले तरी काही गोष्टी या पाळल्या जाणार आहेत. पाकिस्तानसोबत आताही तणाव आहे. यामुळे नेहमीप्रमाणे ध्वजारोहण प्रक्रियेदरम्यान गेट उघडले जाणार नाहीत, तसेच भारताचे जवान पाकिस्तानी रेंजर्सशी हस्तांदोलन करणार नाहीत, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीएसएफ जवानांकडून दररोज ध्वज उतरवला जात होता. लोकांच्या सुरक्षिततेचे कारण देत बीएसएफने ८ मे रोजी या तीन ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रवेश बंद केला होता. ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आला होता. भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. आता जवळपास १३ दिवसांनी या तीन ठिकाणी बिटींग रिट्रीट सेरेमनी होणार आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने चार दिवस भारतावर हल्ले केले होते, परंतू भारताने सर्व हल्ले परतवून लावले होते. तसेच प्रत्त्यूत्तरात भारताने पाकिस्तानचे ११ एअरबेसना नुकसान पोहोचविले होते. यामुळे पाकिस्तान भारताला शरण आला होता. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धविराम करण्यात आला आहे.