मागील काही दिवसापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कर लादण्यास सुरुवात केली आहे. २४ टक्क्यांपासून सुरु झालेले कर ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ट्रम्प यांनी भारतासोबत दुहेरी भूमिका स्वीकारली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सुरू करण्यात रस दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांच्या विधानाला उत्तर दिले आहे.
आज काही वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याची घोषणा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींनीही व्यापार कराराला हिरवा कंदील दाखवला आहे.
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
व्यापार करारावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली. "भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आहेत आणि नैसर्गिक भागीदार देखील आहेत. मला विश्वास आहे की या व्यापार संवादामुळे भारत आणि अमेरिकेतील भागीदारीच्या अफाट शक्यतांचा मार्ग मोकळा होईल. आमची टीम यावर काम करत आहे. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू', असेही मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट शेअर करून व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू करण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "व्यापारातील तफावत दूर करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने व्यापार करारावर पुन्हा चर्चा सुरू केल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. येत्या आठवड्यात मी माझे जवळचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा विचार करत आहे. मला वाटते की दोन्ही देशांमधील व्यापार करारात कोणतीही अडचण येणार नाही."
अमेरिकेने सध्या भारतावर ५० टक्के कर लावला आहे. हा कर २७ ऑगस्टपासून लागू झाला. 'हा कर भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत आहे आणि या पैशाने रशियाने युक्रेन युद्ध सुरू ठेवले आहे, यामध्ये अनेक लोक मारले जात आहेत यासाठी हा कर लादला असल्याचे मत ट्रम्प यांचे आहे.