पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला, भारताकडून समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 10:25 IST2018-06-24T10:21:19+5:302018-06-24T10:25:26+5:30
पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला, भारताकडून समन्स
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे त्यांच्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब गुरुद्वारा येथे जात असताना त्यांना अडविण्यात आले. गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही त्यांना ऐनवेळी प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे इस्लामाबादला माघारी फिरावे लागले.
दरम्यान, पाकिस्तानच्या या कृत्याचा भारताकडून निषेध व्यक्त केला जात आहे. भारताने हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडे उपस्थित केला आहे.. तसेच, या कृतीच्या माध्यमातून पाकिस्तानचा उद्दामपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. मागच्या दोन महिन्यातील अजय बिसारिया यांना गुरद्वारामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची ही दुसरी घटना आहे. अजय बिसारिया गुरुद्वारामध्ये शिख भाविकांची भेट घेणार होते.
पाकच्या उच्चायुक्तांना समन्स
याप्रकरणी भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करत त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. भारतीय उच्चायुक्तांना त्यांचे कर्तव्य करण्यात अडथळा आणणे हा राजनैतिक संबंधांबाबतच्या व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले.