अमेरिकेने भारत आणि रशियाची मैत्री तोडण्यासाठी जेवढे अधिक खटाटोप केले, तोवढीच ही मैत्री अधिक बळकट होत गेली. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात. आता भारत एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकत, पहिल्यांदाच रशियामध्ये एक मोठा खत (फर्टिलाइजर्स) प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या मनसुब्याला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होण्याची शक्यता आहे.
देशातील खतांचा पुरवठा अधिक चांगला आणि स्थिर करण्यासाठी रशियामध्ये प्रकल्प उभारण्याची भारताची इच्छा आहे. प्रस्तावित प्रकल्पात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या एकत्र येत आहेत. रशियातील नैसर्गिक वायू आणि अमोनियाच्या प्रचंड साठ्याचा तसेच कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा फायदा घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. देशातील खतांची कमतरता भरून काढण्यासाठी भारताला या कच्च्या मालाची मोठी आवश्यकता आहे.
डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणे अपेक्षेत आहे. त्यावेळी, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प भारत-रशियाच्या व्यावसायिक संबंधांमध्ये नवीन अध्याय सुरू करेल. रशियात उभारल्या जाणाऱ्या या युनिटमधून वर्षाला २० लाख टन युरिया उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सध्या जमीन अधिग्रहण, नैसर्गिक वायू, अमोनियाच्या किमती आणि लॉजिस्टिक्स खर्चावर वाटाघाटी सुरू आहेत.
खरेतर भारत हा जगातील सर्वात मोठा खत ग्राहक आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला, तर भविष्यात भारताच्या खत आयातीवर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि पुरवठा साखळी मजबूत होण्यास मदत मिळू शकते.