Omicron Alert: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी, 12 देशांमधून येणाऱ्यांसाठी कडक अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 22:44 IST2021-11-28T22:43:34+5:302021-11-28T22:44:02+5:30
Omicron Alert: आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, धोक्याच्या श्रेणीत येणाऱ्या देशांतील प्रवाशांना येथे आल्यावर कोरोना टेस्ट करावी लागेल आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागेल.

Omicron Alert: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी, 12 देशांमधून येणाऱ्यांसाठी कडक अंमलबजावणी
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी 1 डिसेंबरपासून लागू होतील. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी 14 दिवसांची प्रवासाची माहिती सादर करणे आणि कोरोना व्हायरसची निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करणे आता बंधनकारक असणार आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, धोक्याच्या श्रेणीत येणाऱ्या देशांतील प्रवाशांना येथे आल्यावर कोरोना टेस्ट करावी लागेल आणि टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत विमानतळावर थांबावे लागेल. प्रवाशाची टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि आठव्या दिवशी त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. यावेळीही त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला पुढील सात दिवस स्वत:च्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाईल.
याचबरोबर, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, धोकादायक असलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांतील प्रवाशांना विमानतळावरून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल, परंतु त्यांना 14 दिवस आपल्या आरोग्याची स्वतः देखरेख करावी लागेल. विमानतळावर आगमन झाल्यावर एक सॅम्पल म्हणून एकूण प्रवाशांपैकी ५ टक्के प्रवाशांची टेस्ट केली जाईल.
या देशांना धोकादायक क्षेत्रात टाकण्यात आले आहे....
1. यूकेसह युरोपातील सर्व देश
2. दक्षिण आफ्रिका
3. ब्राझील
4. बांगलादेश
5. बोत्सवाना
6. चीन
7. मॉरिशस
8. न्यूझीलंड
9. सिंगापूर
10. झिम्बाब्वे
11. हाँगकाँग
12. इस्रायल