बलात्काराच्या घटनांमध्ये भारत जगात तिस-या स्थानावर
By Admin | Updated: July 24, 2014 12:18 IST2014-07-24T12:15:48+5:302014-07-24T12:18:15+5:30
देशभरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असून २०१० बलात्काराच्या घटनांमध्ये भारत जगात तिस-या स्थानावर असल्याची माहिती समोर येत आहे.

बलात्काराच्या घटनांमध्ये भारत जगात तिस-या स्थानावर
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली दि. २४ - देशभरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असून २०१० बलात्काराच्या घटनांमध्ये भारत जगात तिस-या स्थानावर असल्याची माहिती समोर येत आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत बुधवारी ही माहिती दिली. एवढेच नव्हे तर हत्येच्या गुन्ह्यांचे प्रमाणही भारतात जास्त असून २०१२ साली हत्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक होता.
संयुक्त राष्ट्रांच्या (यु. एन क्राईम ट्रेंड्स सर्व्हे २०१०) अहवालानुसार अमेरिकेत बलात्काराच्या सर्वाधिक (८५ हजार ५९३) केसेस नोंदवल्या गेल्या असून त्यामागोमाग क्रमांक आहे ब्राझीलचा, जेथे बलात्काराची ४१ हजार १८० प्रकरणे नोंदवली गेली. २०१० साली भारतात २२ हजार १७२ केसेस होत्या. अमेरिकेत प्रतिलाख लोकसंख्येमागे २७.३ टक्के, ब्राझीलमध्ये २१.९ टक्के तर भारतात १.८ टक्के केसेस नोंदवल्या गेल्या.
रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमध्ये बलात्काराची १५ हजार ८९३ (प्रतिलाख लोकसंख्येमागे २८.८ टक्के) तर मेक्सिकोमध्ये १४ हजार ९९३ (१३.२ टक्के)केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. फ्रान्समध्ये १० हजार १०८ (१६.२ टक्के), जर्मनीत ७ हजार ७२४, स्वीडनमध्ये ५ हजार ९६०, रशियन फेडरशनमध्ये ४ हजार ९०७, फिलीपाईन्समध्ये ४ हजार ७१८ तर कोलंबियामध्ये ३ हजार १५७ गुन्हे नोंदवण्यात आले.
हत्यांमध्ये भारत दुस-या क्रमांकावर
देशात बलात्कारांप्रमाणेच हत्यांचे प्रमाणही जास्त असून २०१२ साली भारतात ४३ हजार ३३५ प्रकरणे नोंदवली गेली. यात आघाडीवर होता ब्राझील, जिथे हत्येची ५० हजारांहून अधिक हत्या झाल्या होत्या. नायजेरियात ३३ हजार ८१७, मेक्सिकोमध्ये २६ हजार ०३७, काँगोमध्ये १९ हजार ५८६, दक्षिण आफ्रिकेत १६ हजार २५९, कोलंबियात १४ हजार ६७० तर पाकिस्तानात १३ हजार ८४६ गुन्हे नोंदवले गेले.