नवी दिल्ली : येत्या ऑगस्टपर्यंत कोविड-१९ विरोधी लसीच्या उत्पादनात दुपटीने वाढ करून दरमहा १४० दशलक्ष डोसची निर्मिती करण्याचे नवे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने एक सादरीकरण नुकतेच पंतप्रधानांना देण्यात आले. त्यात हे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्या संयुक्तरीत्या हे उद्दिष्ट पूर्ण करतील. त्यांना नियामकीय, तसेच कार्यवाहीच्या स्वरूपातील मदत भारत सरकारकडून केली जाईल. सूत्रांनी सांगितले की, पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या कोविशिल्ड लसीच्या ६० दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करीत आहे. तर भारत बायोटेक आपल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ४ दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करते.सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या प्रथमच १ लाखाच्या वर गेली आहे. लसीकरणाला वेग देण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यासाठी पंतप्रधान गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, पुण्यातील एसआयआयकडून अपेक्षित लस उत्पादन न झाल्यामुळे सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत दरमहा लस उत्पादन क्षमता १०० दशलक्ष डोसपर्यंत नेऊ, असे कंपनीने गेल्या वर्षी लसीला आपत्कालीन वापर परवानगी मिळण्याच्या आधी म्हटले होते.
Corona Vaccination: ऑगस्टपर्यंत कोविड लसीचं उत्पादन दुपटीनं वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 06:55 IST