India shot down 8 Pakistani missiles Video: पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांनी पूंछ सेक्टरमध्ये १६ भारतीय नागरिकांचा बळी घेतला. यानंतर भारत सरकारच्या सैन्यदलांनी आक्रमक पवित्रा घेत, दिवसभरात पाकिस्तानच्या विविध शहरामध्ये ड्रोन हल्ले करत पाकिस्तानला ( India Pakistan War ) अनेक हादरे दिले. त्यानंतर आज अंधार पडल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा जम्मू काश्मीर परिसरात हल्ले करण्यास सुरुवात केली. हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि ८ ड्रोन मिसाईल्स पाडण्यात आली.
पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी
जम्मूसह, पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न करण्यात आला होता, जो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हाणून पाडला. जम्मूमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर हवाई सायरन वाजवण्यात आले. संपूर्ण जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आणि ब्लॅकआऊट करण्यात आले. लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मूच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटाच्या आवाजानंतर जम्मूमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. जम्मूमध्ये ५-६ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता सांगितली जात आहे. अखनूर सेक्टरमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ले करत, निष्पाप भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय सेनेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.
पाकिस्तानची ८ मिसाईल्स पाडली
जम्मूमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले झाले आहेत. सीमेपलीकडूनही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हवाई संरक्षण यंत्रणेने ८ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत.
आकाशात ड्रोन दिसल्यानंतर जम्मूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मूनंतर काश्मीरच्या कुपवाडामध्येही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. जम्मूमध्ये पाकिस्तानचा हल्ला भारताने उधळून लावला. भारताने पाकिस्तानच्या ८ क्षेपणास्त्र प्रणाली पाडल्या. हल्ल्यानंतर, संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. त्याचवेळी, काश्मीरमधील कुपवाडा येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.