नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून तिथल्या दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात अनेक टॉपचे दहशतवादी मारले गेले. त्यानंतर या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्य अधिकारी उपस्थित राहिल्याने जागतिक स्तरावर पाकचा खरा चेहरा उघड झाला. ऑपरेशन सिंदूरमध्येभारतीय सैन्याने दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकचा चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर भारतीय एअरफोर्सने अचूक हल्ले करत पाकिस्तानातील एअरबेस उद्ध्वस्त केले.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र १० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला. या दोन्ही देशातील सैन्य DGMO अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली, त्यानुसार दोन्ही बाजून तात्काळ गोळीबारी आणि सैन्य कारवाई थांबवण्यात आली. या घटनेनंतर देशातील जनतेला काय वाटते, याबाबत सी वोटरने सर्व्हे केला आहे. यात लोकांना पाकिस्तानविरोधात मोदी सरकारने उचललेल्या पावलाने समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला. इंडिया टुडेने सी वोटरचा सर्व्हे पुढे आणला आहे. ज्यात लोकांची मते जाणून घेतली आहेत. सी वोटरने हा सर्व्हे १०, ११ आणि १२ मे रोजी केला आहे.
प्रश्न - मोदी सरकारच्या कारवाईनं समाधानी आहात का?
या प्रश्नावर ६८.१ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिले आहे. पाकिस्तानविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. त्यात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले. या कारवाईमुळे ६८.१ टक्के लोक समाधानी आहेत. तर ५.३ टक्के लोक सरकारच्या कारवाईवर असमाधानी आहेत. १५.३ टक्के लोकांनी कुठलेही उत्तर दिले नाही. ६३.३ टक्के लोक युद्धविरामाच्या निर्णयावर समाधानी आहेत. १०.२ टक्के लोकांना युद्धविराम न होण्याची इच्छा होती. युद्धविरामवर १७.३ टक्के लोकांनी उत्तर देणे टाळले.
प्रश्न - चीन आणि पाकिस्तानमध्ये भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?
युद्धविरामच्या आधी आणि त्यानंतर लोकांनी या प्रश्नावर वेगवेगळी मते नोंदवली. युद्धविराम होण्यापूर्वी ४७.४ टक्के लोकांनी चीन भारताचा मोठा शत्रू असल्याचे म्हटलं तर २७.७ टक्के लोकांनी पाकिस्तानला मोठा शत्रू मानले. १२.२ टक्के लोकांनी हे दोन्ही पर्याय निवडले. युद्धविरामनंतर ५१.८ टक्के लोकांना चीन तर १९.६ टक्के लोकांना पाकिस्तान भारताचा मोठा शत्रू आहे असं वाटते. तर २०.७ टक्के लोकांनी दोन्ही देश शत्रू असल्याचे सांगितले.
प्रश्न - भारतीय सैन्य क्षमतेवर किती विश्वास?
सी वोटरच्या सर्व्हेनुसार, युद्धविरामआधी ९१.१ टक्के लोकांनी भारतीय सैन्याच्या क्षमतेवर सर्वाधिक भरवसा असल्याचे म्हटले तर ६.१ टक्के लोकांनी काही प्रमाणात विश्वास असल्याचे म्हटले. १ टक्के लोकांनी विश्वास नसल्याचे सांगितले. युद्धविराम झाल्यानंतर ९२.९ टक्के लोकांनी सैन्याच्या क्षमतेवर विश्वास दर्शवला तर ०.७ टक्के लोकांनी अविश्वास दर्शवला.