India-Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी शनिवारी(10मे) युद्धविराम घोषित करण्यात आला. या निर्णयानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामबाबत सरकारने तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी पत्रात लिहिले की, "संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावण्यात यावे, या विरोधकांच्या एकमताने केलेल्या आवाहनाचा मी पुनरुच्चार करतो. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम जाहीर केलेल्या युद्धविरामावर चर्चा करणे खूप महत्वाचे आहे. पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची ही एक संधी असेल. मला खात्री आहे की तुम्ही या मागणीचा गांभीर्याने विचार कराल आणि लवकरच त्यावर निर्णय घ्याल."
मल्लिकार्जुन खरगे यांनीही लिहिले पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, "तुम्हाला आठवत असेल की, 28 एप्रिल 2025 रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आवाहन केले होते. आता ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामची घोषणा झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पुन्हा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे," असे खरगेंनी आपल्या पत्रात म्हटले. आता यावर सरकार काय निर्णय घेणार, हे पाणे महत्वाचे असेल.