जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. दहशतवाद संपवण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही हे भारताने सिद्ध केलं आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युद्ध धोरणाचं भरभरुन कौतुक केलं आहे.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आपल्या कॉलममध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्व क्षमतेचं खूप कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर बुद्धिमान आणि संतुलित असल्याचं त्यांनी सांगितलं. कॉलममध्ये असंही लिहिलं आहे की, "२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या दहशतवादी घटनेनंतर सर्वजण दहशतवाद्यांकडून बदला घेण्याची मागणी करत होते. अशा परिस्थितीत सरकारने मर्यादित लष्करी कारवाईचा मार्ग निवडून एक मोठं युद्ध टाळलं आहे."
"भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर"
"भारताने केलेली कारवाई अत्यंत मर्यादित आणि सुनियोजित होती. ज्याचा उद्देश दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधा नष्ट करणं होता." चिदंबरम यांनी त्यांच्या कॉलममध्ये या कारवाईला पंतप्रधान मोदींचं एक समजुतदारपणाचं पाऊल असं म्हटलं आहे. तसेच चिदंबरम यांनी त्यांच्या लेखात ७ मे रोजी भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्याचे कौतुक केलं आहे. भारतीय सैन्याची कारवाई कायदेशीर आणि लक्ष्य केंद्रीत होती. भारतीय लष्कराने त्यांच्या हवाई हल्ल्यादरम्यान लष्करी आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलं नाही. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद, दार रेझिस्टन्स फ्रंट सारख्या दहशतवादी गटांचा पूर्णपणे खात्मा झाला आहे असं मानणं थोडी घाई ठरू शकते असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
पंजाब, काश्मीर आणि जम्मूच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये गोळीबाराचा आवाज येत असला तरी तिथे राहणारे लोक घाबरले नाहीत. पाकिस्तानला चोख उत्तर देण्याच्या ते तयारीत आहेत. हल्ला झाल्यास नेमकं काय करायचं हे महिला त्यांच्या मुलांना शिकवत आहेत आणि माजी सैनिक तरुणांना देश आधी येतो, मग सर्व काही... हे समजावून सांगत आहेत. "आम्ही गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू" असा निर्धार पंजाबपासून काश्मीरपर्यंत करण्यात आला आहे.