पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करत घेतलेला बदला, यानंतर मागच्या तीन चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात कमालीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता दोन्ही देश शस्त्रसंधीला राजी झाले असून, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला आहे. याबाबतची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत अधिक माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, आज दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. यावेळी झालेल्या चर्चेत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देश जमीन आकाश आणि पाण्यामधून होत असलेले हल्ले तत्काळ प्रभावाने थांबवण्यावर सहमत झाले आहेत. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. आता दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी पुढील चर्चा करतील, असेही विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
दरम्यान,२२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या वातावरणात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते नष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या आक्रमक कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. तसेच पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवरील अनेक भागांना लक्ष्य करत ड्रोन तसेच क्षेपणास्त्रे डागली होती. तर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानमधील अनेक लष्करी केंद्रांना लक्ष्य केले होते. मात्र अमेरिकेने पुढाकार घेत मध्यस्ती केल्यानंतर हा संघर्ष आता थांबला आहे.