पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि प्रत्युत्तरदाखल भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थितीत निर्माण झाली असतानाच गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील ३६ ठिकाणांना लक्ष्य करत ३०० ते ४०० ड्रोनच्यामाध्यमातून हल्ला केला. दरम्यान, यापैकी बहुतांश ड्रोन हे निशस्त्र होते. पाकिस्तानने भारतातील संरक्षण केंद्रांची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला केला होता, अशी धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ड्रोन हे तुर्कीमधील होते, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ८ मे रोजी भारतातील विविध शहरांवर झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी सैन्याने तुर्कीमध्ये निर्मिती झालेले ड्रोन वापरले असण्याची शक्यता आहे. ड्रोनच्या अवशेषांच्या प्राथमिक तपासांमधून हे ड्रोन तुर्कीमधील Assisguard Songar मॉडेलचे होते, अशी माहिती समोर आली आहे. या ड्रोनचा वापर टेहेळणी आणि अचूक हल्ल्यांसाठी केला जातो.
याबाबत अधिक माहिती देताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, ८ आणि ९ मे दरम्यानच्या रात्री पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण पश्चिमेच्या सीमावर्ती भागामध्ये भारताच्या हवाई हद्दीचं अनेकदा उल्लंघन केलं, या हल्ल्याचा उद्देश भारताच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा होता. तसेच पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला.
त्यांनी पुढे सांगितले की, सीमारेषेवरून मोठ्या प्रमाणावर ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर लेहपासून सर क्रिकपर्यंत ३६ ठिकाणी सुमारे ३०० ते ४०० ड्रोन आणि इतर घातक पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, पाकिस्तानच्या या हल्ल्याचा उद्देश भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमच्या क्षमतेची तपासणी करणे आणि गोपनीय माहिती मिळवण्याचा होता. पाकिस्तानकडून ड्रोन पाठवण्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे आमि भारतीय लष्कराच्या सैनिकी ठिकाणांबाबत माहिती मिळवणे हा असू शकतो.
या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने पुढे सांगितले की, पाकिस्तानचा एक सशस्त्र ड्रोन भटिंडा येथील लष्करी केंद्राला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली होती. मात्र हे ड्रोनही वेळीच नष्ट करण्यात आले. दरम्यान, भारताने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने चार पाकिस्तानी एअर डिफेन्स साइट्सवर सशस्त्र ड्रोन पाठवले होते. त्यपैकी एका ड्रोनने एक एअर डिफेन्स रडार नष्ट केला.