Pakistan Drone Attack, Indian Civilian Family Injured Video: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर गेले २ दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. पाकिस्तान नागरी विमानांच्या आडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. काल अंधार पडल्यावर पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या भागांमध्ये ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर आजही रात्री अंधार वाढल्यानंतर पाकिस्तानने भारतातील विविध शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचा नीचपणा वाढतच चालला असून यावेळी पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानने रात्री ८ नंतर अंधार अधिक दाट व्हायला लागल्यानंतर कालप्रमाणेच आजही हल्ले सुरु केले. या हल्ल्यात एक निष्पाप सामान्य कुटुंब जखमी झाले आहे. पाकिस्तानने पंजाबच्या फिरोजपुर परिसरात ड्रोन हल्ला घडवून आणला. पाकिस्तानच्या ड्रोनची हालचाल दिसताच, त्या परिसरात पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आला आणि सायरनचे मोठमोठे आवाजही सुरु झाले. त्यासोबत भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिल्याने काही भागात स्फोटांचेही आवाज झाल्याचे पाहायला मिळाले. फिरोजपुरमध्ये पाकिस्तान ड्रोनने रहिवासी वस्तीवर हल्ला केला. त्यात एक संपूर्ण परिवार जखमी झाल्याचे वृत्त ANI ने दिले आहे. जखमी सदस्यांना लगेचच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव अद्यापही सुरू आहे. दरम्यान, आज पाकिस्तानी ड्रोननी भारताच्या हद्दी पुन्हा घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. जम्मू, सांबा आणि पठाणकोट विभागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूसह उधमपूर भागात पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. तसेच भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने यापैकी अनेक ड्रोन नष्ट केल्याने स्फोटांचा आवाज येत आहे.