India navy will get INS Kavaratti today; less with submarines killers power | नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार

नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार

भारताची संरक्षण दले हळूहळू स्वदेशी शस्त्रास्त्रांकडे वळू लागली आहेत. भारतीय नौदलाला आज 90 टक्के स्वदेशी उपकरणे लावलेली खतरनाक युद्धनौका मिळाली आहे. ही युद्धनौका पाणबुड्यांचा कर्दनकाळ बनणार आहे. प्रोजेक्ट- 28 अंतर्गत ही युद्धनौका बनविण्यात आली असून लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे आज विशाखापट्टनममध्ये ही युद्धनौका नौदलाकडे सोपविली आहे. प्रोजेक्ट 28 नुसार चार स्टील्थ युद्धनौका बनविण्यात आल्या आहेत. यापैकी तीन युद्धनौका याआधीच देशसेवेत आहेत. ही या श्रेणीतली चौथी युद्धनौका असून तिचे नाव आयएनएस कवरत्ती असे आहे. महत्वाचे म्हणजे ही नौका भारतीय नौदलाच्या अभियंत्यांनीच डिझाईन केली आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आली होती. INS कमोर्टा (2014), INS कदमत (2016), INS किल्टन (2017) या तीन युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आहेत. 


वैशिष्ट्ये 

  • युद्धनौकेवरील 90 टक्के उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत. या युद्धनौकेच्या बांधणीमध्ये कार्बन कंपोझिटचा वापर करण्यात आला आहे. हे नौदलाला मिळालेले मोठे यश आहे. 
  • आयएनएस कवरत्तीचे डिझाईन हे भारतीय नौदलाच्या नौदल डिझआईन महानिदेशालय (डीएनडी) ने तयार केले आहे. तर या नौकेची बांधणी कोलकाता गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्सने केले आहे. 
  • आयएनएस कवरत्ती पाणबुड्य़ांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यामध्ये सक्षम आहे. यासाठी स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि सेन्सर लावण्यात आले आहेत. 
  • पाणबुड्यांविरोधात मोहिम सुरु असताना स्वत:चा बचाव करणे आणि लांब पल्ल्याच्या मोहिमांना यशस्वी पूर्ण करणे ही तिची खासियत आहे. 
  • कवरत्ती हे नाव एकेकाळी भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या मिसाईलने युक्त अशा युद्धनौकेवरून ठेवण्यात आले आहे. या युध्दनौकेने पाकिस्तानच्या तावडीतून बांग्लादेशला सोडविण्याच्या 1971 च्या युध्दात महत्वाची भूमिका निभावली होती. 


आयएनएस विक्रांतही लवकरच येणार
भारताची पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच चाचणीनंतर हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान तैनात केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस विक्रांतची हार्बर चाचणी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर लवकरच याची बेसिनची चाचणीही सुरू केली जाईल. स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत 2023 पर्यंत नौदलात सामील होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस विक्रांतच्या हार्बर चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्याच्या बेसिन चाचण्यांना उशीर झाला आहे. बेसिन चाचण्यांमध्ये बसवलेल्या सर्व उपकरणांची चाचणी केली जाते व जहाज समुद्रात उतरण्यास सक्षम आहे की नाही याचा अभ्यास केला जातो. भारतीय नौदलाने विशाखापट्टणममध्ये आयएनएस विक्रांत तैनात करू इच्छित असल्याचं सांगितलं आहे. 

विराट युद्धनौका

आयएनस विराट युध्दनौका ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली. रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस हर्मीस या नावाने ओळखली जात होती. भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली. यानंतर या युद्धनौकेने भारत भूमीची सेवा केली. भारतीय नौदलात ३० वर्षांची गौरवपूर्ण सेवा बजावलेली ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालय बनविण्यात येणार होते. मात्र, हा प्रकल्प परवडणारा नसल्याने तो रद्द करावा लागला आहे. २७,८०० टन वजनाची आणि १३ मजली उंचीच्या ‘विराट’चे संग्रहालय करण्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. 

विक्रांत युद्धानौका भंगारात

‘आयएनएस विक्रांत’ या भारतीय नौदलाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेच्या नशिबी शोकांतिका आली होती.  या युद्धनौकेचेही संग्रहालयात रूपांतर करण्याचे महाराष्ट्र सरकार व काही खासगी संस्थांनी दिलेले प्रस्तावा फलद्रुप होतील याची तब्बल १७ वर्षे वाट पाहिल्यानंतर सन २००४ मध्ये ‘विक्रांत’चा भंगारात लिलाव पुकारावा लागला होता. या विक्रांतच्या लोखंडापासून बजाज ऑटोमोबाईलने बाईकही बाजारात आणली होती. 

वि्क्रांतबाबत थोडेसे 

‘विक्रांत’ या एका शब्दातच भारतीय नौसेनेचा ‘भीमपराक्रम’ सामावलेला आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामात विक्रांतवरच्या आकाशयोद्धय़ांनी (Air Worriers) ५0-५0 उड्डाणे करून चार दिवसांत पाकिस्तानी सैन्याला ‘पळता भुई थोडी’ करून टाकले. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘विक्रांत आम्ही बुडवली’ असा डांगोरा पाकिस्तानने पिटला होता. त्याला हे सडेतोड उत्तर होते. व्हाईट टायगर, कोब्रा, अँँजलस, हारपून ही विमाने विक्रांतवर तैनात होती. ही युद्धनौका १९६१ मध्ये कॅप्टन पी. एस. महेंद्रु यांच्या नेतृत्वाखाली भारतात येत असताना तिला काळ्या समुद्रात सागरी वादळाला तोंड द्यावे लागले. त्याबाबत वसंतराव लिमये म्हणतात, ‘२५-३0 मीटर उंच लाटा, खवळलेला समुद्र, काळीभोर रात्र, विक्रांत १0-१५ अंशात कलंडून पाण्यात फ्लॅग मास्ट टेकत. माझा पहिला अनुभव; पण आम्ही सुखरूप बाहेर पडलो. पुण्यात आल्याबरोबर प्रथम ‘तळ्यातल्या गणपतीला’ नारळ फोडला. १९७१ च्या युद्धात ‘रिझर्व्हिस्ट’ म्हणून बोलावले, तेव्हा जहाजावर हजर होताना प्रभाने धीराने ओवाळले. जिंकून परत आलो. भारतीय आरमारात विक्रांत दाखल होताच अनेक युद्धसरावांत तिने भाग घेतला. आशिया खंडात अवतरलेल्या या विमानवाहू नौकेचे अप्रूप होते. या उत्कंठेपोटीच १९६३ मध्ये विक्रांतवर थरार, युद्धसदृश संकट आले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India navy will get INS Kavaratti today; less with submarines killers power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.