नवी दिल्ली: आगामी काळात बिहारसह अन्य राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणना हे दोन मुद्दे प्रमुख राहणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या बैठकीत दिले.
भाजपने रविवारी रालोआशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. यात गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २० राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित होते.
पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर, सुशासन आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचे यश हे भारत देश स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतीक आहे. देशात विकसित करण्यात आलेले स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान किती अचूक आणि प्रगत आहे, हेही या ऑपरेशनच्या माध्यमातून जगाला बघायला मिळाले आहे.
स्वावलंबी भारत बनवायचा आहे
जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधान म्हणाले की, देशातील उपेक्षित आणि मागासलेल्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होय. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक जीवनात बोलताना मर्यादा पाळावी
ऑपरेशन सिंदूर आणि लष्करातील जवानांच्या मुद्द्यांवर उलटसुलट विधाने करणाऱ्यांना मोदींनी समज दिली. सार्वजनिक जीवनात बोलताना मर्यादा पाळली पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावर बोलणे आवश्यक नाही. अनावश्यक विधानांमुळे पक्षाची प्रतिमा प्रभावित होते, असे ते म्हणाले.
खरे हिरो मोदीजी आहेतः
एकनाथ शिंदे व अभिनेते पवन कल्याण बैठकीनंतर चित्रपटासंदर्भात चर्चा करत होते. तेव्हा मोदी तेथे आले आणि काय सुरू आहे, मलाही सांगा, असे म्हणाले. यावर पवन कल्याण म्हणाले की, शिंदेजी म्हणाले की, मी हिरो आहे. पण खरे हिरो तर मोदीजीच आहेत. नंतर त्यांनी पंतप्रधानांनी सर्वांसोबत फोटो काढला.
आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना
एनडीएच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरबाबतचा ठराव मांडण्याची संधी मिळाल्याचा आनंद एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आर्मी, नेव्ही व एअरफोर्सने दहशतवाद्यांना धडा शिकविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पराक्रम करून दाखविला आहे. त्यांच्यामुळे सामान्य भारतीयांमध्ये आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने खासदार श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. यूएई दौऱ्यावर गेलेले श्रीकांत भारताची बाजू भक्कमपणे मांडत असून, त्याचा मला अभिमान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला ठराव
केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बैठकीची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत दोन ठराव मंजूर करण्यात आले. यातील पहिला ठराव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारतीय सेनेने दाखविलेला पराक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्त्वाचे कौतुक करण्याबाबतचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, तर दुसरा ठराव जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबाबत होता.
नड्डा म्हणाले की, भाजप जातीचे राजकारण करत नाही, तर वंचित, पीडित, शोषित आणि मागास दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. . जातनिहाय जनगणना याचे उत्तम उदाहरण आहे.
क्षणचित्रे : १) पंतप्रधानांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी दोन मिनिटे स्वतंत्र चर्चा केली. २) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला नक्षलवादमुक्त देश बनविण्याचा पुनरूच्चार केला. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादविरोधी लढा कसा यशस्वी होत आहे, याची माहिती उपस्थितांना दिली. ३) आणीबाणीला २५-२६ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त काँग्रेसच्या विरोधात भाजप देशव्यापी अभियान राबविणार आहे. ४) मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन आणि सुशासन तसेच बिहार निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा.