संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय; मुंबईत PM मोदींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:05 IST2025-01-15T18:03:38+5:302025-01-15T18:05:26+5:30

जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

India is working with the spirit of development considering the entire world as one family PM Modi statement in Mumbai | संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय; मुंबईत PM मोदींचे वक्तव्य

संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय; मुंबईत PM मोदींचे वक्तव्य

PM Narendra Modi: "निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झालं आहे," असं मत पंतप्रधाननरेंद्र मोदी व्यक्त केलं आहे. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून १०० हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार नरेंद्र मोदी यांनी काढले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नौदल प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला.

युद्धनौकांविषयी थोडक्यात…

आयएनएस सूरत – हे प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये ७५ टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत.

आयएनएस वाघशीर – स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे.

आयएनएस निलगिरी – स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे.
 

Web Title: India is working with the spirit of development considering the entire world as one family PM Modi statement in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.