संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 07:03 IST2026-01-26T07:03:07+5:302026-01-26T07:03:38+5:30
President's Message To The Nation: जगाच्या अनेक भागांत वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे.

संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश
नवी दिल्ली - जगाच्या अनेक भागांत वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. ७७ व्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूर, महिला सक्षमीकरण यांसह वंदे मातरम तसेच वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले.
प्राचीन संस्कृतीच्या बांधिलकीच्या आधारे जागतिक ऐक्य साधण्याच्या दृष्टीने भारताचे ‘शांततेचा दूत’ म्हणून असलेले स्थान राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. संपूर्ण विश्वात शांतता नांदावी म्हणून भारतीय परंपरेत आपण नेहमीच प्रार्थना करीत आलो आहोत. संपूर्ण जगात अशी शांतता नांदली तरच मानवी जीवनाचे भविष्य सुरक्षित राहील, असे त्या म्हणाल्या.
गरिबी निर्मूलनात भारताची कामगिरी आणि ८१ कोटी लाभार्थ्यांना विविध योजनांचा दिला जात असलेला लाभ महत्त्वाचा ठरत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. ‘विकसित भारत’ हा सर्वसमावेशक असला पाहिजे, असे सांगून आदिवासी व उपेक्षित घटकांना केंद्र मानून हा विकास व्हायला हवा, असे मुर्मू यांनी नमूद केले.
राष्ट्रवादाला चालना
१. भारतीय संविधान आता आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध असलेल्या सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध असल्याचे सांगून संवैधानिक राष्ट्रवादाला चालना या देशाच्या दृष्टीने मैलाचा दगड असल्याचे त्या म्हणाल्या. आता भारतीय नागरिक आपल्या मातृभाषेत देशाच्या पायाभूत दस्तऐवजाशी जोडला गेला असल्याचे मुर्मू यांनी नमूद केले.
२. भारतीय लोक विवेकाबुद्धीने प्रलोभनांपासून दूर राहून कोणताही पूर्वग्रह न बाळगता मतदान करतील, अशी अपेक्षा मुर्मू यांनी व्यक्त केली. चुकीच्या माहितीपासून दूर राहून हे लोक मतदानाचा अधिकार वापरतील, असेही त्या म्हणाल्या.
या मुद्द्यांचा केला उल्लेख
- ऑपरेशन सिंदूरद्वारे सीमापार दहशतवादाचे कंबरडे मोडून राष्ट्रीय सुरक्षेबाबतची वचनबद्धता भारताने सिद्ध केली.
- संरक्षण क्षेत्रातील आपल्या स्वावलंबनामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे यश मिळाले.
- समस्त भारतीयांचा सेना, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांवर व त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असल्याचा विशेष उल्लेख.
- २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने उदयास आलेल्या नारी शक्तीचे कौतुक केले.
- ग्रामीण बचतगटांपासून अवकाश क्षेत्रातील महिलांचा गौरव त्यांनी केला.