नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी २० जानेवारीला होत आहे. या शपथविधी सोहळ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प शपथ घेणार असून, ते दुसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमाचे भारताला निमंत्रण मिळाले असल्याचे रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
शपथविधीनिमित्त वॉशिंग्टन दौऱ्याच्या निमित्ताने जयशंकर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. ट्रम्प-वेन्स शपथविधी समितीने परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना निमंत्रण दिले आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होण्यासोबत जे. डी. वेन्स हे अमेरिकेचे नवे उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधी कार्यक्रमासाठी इतर देशांतून येणाऱ्या काही मान्यवरांसोबत जयशंकर चर्चा करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. उत्पादन शुल्क धोरण, हवामान बदल, तसेच रशिया-युक्रेनचा संघर्ष व आशियातील स्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासन राबवत असलेल्या धोरणासह काही संवेदनशील मुद्यांवर अनेक देशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी जानेवारी २०१७ ते २०२१ या दरम्यान ट्रम्प देशाचे राष्ट्राध्यक्ष होते.
परंपरा मोडत चीन राष्ट्राध्यक्षांना आमंत्रण जागतिक पातळीवरील नेत्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधीला आमंत्रित न करण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेला फाटा देत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वैयक्तिकरीत्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींगसह जगभरातील नेत्यांना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.