लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने आता पाकिस्तानला जाणारे चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. इतकेच नव्हे, तर भारत आता काश्मिरातील किशनगंगा धरणातून पाकिस्तानला जाणारे झेलम नदीचे पाणी रोखण्याचीही तयारी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. यामुळे पाकमध्ये पाण्याचे मोठे संकट उद्भवू शकते.
चिनाब नदीवर बांधण्यात आलेल्या बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारे पाणी रविवारी रोखण्यात आले. यामुळे पाकिस्तानला जाणाऱ्या चिनाबचे पात्र कोरडे पडले आहे. चिनाब नदी ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची जीवन रेखा समजली जाते. पंजाब प्रांतातील शेती याच नदीच्या पाण्यावर अवलंबून असून, पिण्याच्या पाण्यासाठीही चिनाबवरच अवलंबून राहावे लागते. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात बगलिहार धरणावरून प्रदीर्घ काळापासून वाद सुरू आहे. या वादात जागतिक बँकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. चिनाबचे पाणी रोखल्यानंतर आता काश्मिरातील किशनगंगा धरणामार्फत झेलम नदीचे पाणी थांबवण्याची योजना भारताने तयार केली आहे.
पाकच्या शेतीचे काय?सिंधू जल करारानुसार पाकिस्तानला पश्चिमेकडील सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर नियंत्रण देण्यात आले आहे. पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे ९३ टक्के पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो. पाकची ८० टक्के शेती या पाण्यावर अवलंबून आहे.
भारताला कोणता अधिकार?भारत जम्मूच्या रामबनमधील बगलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणांमधून आपल्या बाजूने पाणी कधी सोडायचे आणि कधी रोखायचे याचे वेळापत्रक ठरवू शकतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की, या धरणांमधून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय भारत बंद करू शकतो.
हवाईदल प्रमुखांसाेबत पंतप्रधान मोदी यांची पाऊण तास चर्चानवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शनिवारी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी अरबी समुद्रातील मार्गांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी हवाईदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. पाऊण तास चाललेल्या या भेटीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली याबाबत सूत्रांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दोन पाकिस्तानी हेरांना अटक : पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी रविवारी दोन हेरांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की दोघेही परदेशात लष्करी छावण्या आणि हवाई दलाच्या तळांची माहिती आणि छायाचित्रे पाठवत होते. हे दोघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे कार्यकर्ते आहेत.
वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना उत्तरदिल्लीतील भारत मंडपम येथे सनातन संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारी म्हणाले की, संरक्षणमंत्री म्हणून माझी जबाबदारी सुरक्षा दलांसोबत काम करणे आणि भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या चोख उत्तर देणे हे आहे.