चिनी बंडखोर नेत्याचा व्हिसा भारताने केला रद्द
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30
चीनने आक्षेप घेतल्यानंतर त्या देशाचे अग्रणी बंडखोर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा भारताने तडकाफडकी रद्द केला आहे.

चिनी बंडखोर नेत्याचा व्हिसा भारताने केला रद्द
नवी दिल्ली : चीनने आक्षेप घेतल्यानंतर त्या देशाचे अग्रणी बंडखोर नेते डोल्कन इसा यांचा व्हिसा भारताने तडकाफडकी रद्द केला आहे. ते धर्मशाला येथे ३० एप्रिल ते १ मे पर्यंत चालणाऱ्या ‘इंटरइथेनिक इंटरफेथ लीडरशिप’ या परिषदेत सहभागी होणार होते. दरम्यान निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून मोदी सरकार चीनपुढे झुकल्याचा आरोप होत आहे.
आम्ही इसा यांचा व्हिसा रद्द केला असल्याचे गृह मंत्रालयाच्या प्रवत्याने सोमवारी स्पष्ट केले, मात्र त्याबाबत तपशील देण्याचे टाळले. इसा हे जागतिक उइगर काँग्रेस(डब्ल्यूयूसी) समितीचे कार्यकारी प्रमुख असून ते जर्मनीत वास्तव्याला आहेत. अमेरिकेच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे. तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुस्लिमांचे प्राबल्य आणि कायम अस्थैर्य राहात आलेल्या शिनजियांग प्रांतात इसा यांचे दहशतवादाला समर्थन असल्याचा चीनचा आरोप असून गेल्याच आठवड्यात भारताने त्यांना परिषदेला हजेरी लावण्यास परवानगी दिली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>चीनने जाहीर केली होती नाराजी
पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित करावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सादर केलेला प्रस्ताव चीनच्या विरोधामुळे मंजूर होऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर भारताने इसा यांना व्हिसा मंजूर करताच चीनने त्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त होती.
मसूद अझहरशी तुलना नको -इसा
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्याशी माझी तुलना केली जाऊ नये, असे डोल्कन इसा यांनी वृत्तसंस्थेला ई-मेलद्वारे पाठविलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. अखेरच्या क्षणी भारताने व्हिसा रद्द केल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली.