स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची चाचणी यशस्वी; DRDO च्या 'या' तंत्रज्ञानाचा कसा होणार उपयोग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 15:00 IST2025-05-04T14:56:26+5:302025-05-04T15:00:04+5:30
भारताने स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली उड्डाण-चाचणी करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची चाचणी यशस्वी; DRDO च्या 'या' तंत्रज्ञानाचा कसा होणार उपयोग?
DRDO Stratospheric Airship: संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने ३ मे रोजी मध्य प्रदेशातील श्योपूर चाचणी स्थळावरून स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली यशस्वी चाचणी घेतली. हे प्लॅटफॉर्म आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केले आहे. सैन्याच्या देखरेखीची क्षमता वाढवण्यासाठी हे विकसित केले जात आहे. जगातील फार कमी देशांना ही कामगिरी साध्य करता आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली उड्डाण चाचणी केली. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात, डीआरडीओने श्योपूर चाचणी स्थळावरून स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडल्याची माहिती दिली. आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केलेले हे एअरशिप प्लॅटफॉर्म पेलोडसह लाँच करण्यात आले होते.
हे एअरशिप प्लॅटफॉर्म एका पेलोडसह सुमारे १७ किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि त्याचा उड्डाण कालावधी सुमारे ६२ मिनिटे होता. या कालावधीत मिळालेला डेटा भविष्यातील उंचीवरील हवाई मोहिमांसाठी उच्च-गुणवत्तेचे सिम्युलेशन मॉडेल विकसित करण्यासाठी वापरला जाईल. या एअरशिपचा उपयोग हवामान निरीक्षणासाठीही केला जाऊ शकतो. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवता येणार आहे.
उड्डाणादरम्यान एन्क्लोजर प्रेशर कंट्रोल आणि इमर्जन्सी डिफ्लेशन सिस्टीमची देखील चाचणी घेण्यात आली आणि चाचणीनंतर त्या सिस्टीम सुरक्षितपणे रिस्टोर करण्यात आल्या. डीआरडीओने एक्सवरुन याची माहिती दिली. "ही 'हवेपेक्षा हलकी' प्रणाली भारताच्या पृथ्वी निरीक्षण, बुद्धिमत्ता, पाळत ठेवणे आणि टोही (आयएसआर) क्षमता वाढवेल, ज्यामुळे भारत हे स्वदेशी तंत्रज्ञान असलेल्या काही मोजक्या देशांपैकी एक होईल," असं एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
DRDO successfully conducts maiden flight trial of Stratospheric Airship with instrumental payload to an altitude of around 17 kms. This lighter than air system will enhance India’s earth observation and Intelligence, Surveillance & Reconnaissance capabilities, making the country… pic.twitter.com/HXeSl59DyH
— DRDO (@DRDO_India) May 3, 2025
डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत म्हणाले की, हे प्रोटोटाइप उड्डाण हवेपेक्षा हलक्या उंचीच्या प्लॅटफॉर्म सिस्टमच्या निर्मितीच्या दिशेने एक मैलाचा दगड आहे जे स्ट्रॅटोस्फियर किंवा स्ट्रॅटोस्फियरमध्ये खूप काळ हवेत राहू शकते. स्ट्रॅटोस्फियर हा वातावरणाच्या विविध थरांपैकी एक आहे. हे एअरशिप भविष्यात भारताला पाळत ठेवणे, दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये धोरणात्मक फायदा देऊ शकते.