पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; पहिल्यांदाच देण्यात आले २ कोटी डोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:01 IST2021-09-17T17:59:28+5:302021-09-17T18:01:37+5:30
कोरोना लसीकरण अभियानात रेकॉर्डब्रेक; दिवसभरात २ कोटी लोकांना लसीचा डोस

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; पहिल्यांदाच देण्यात आले २ कोटी डोस
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशात लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे. देशात पहिल्यांदाच कोरोना लसीचे दोन कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशभरातल्या लसीकरण केंद्रांवर आताही लसीकरण सुरू आहे. सर्वच राज्यं अधिकाधिक लसीकरण करण्याच्या प्रयत्नात आहेत. लसीकरण अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या को-विन प्लॅटफॉर्मनं दोन कोटींहून अधिक लसीकरण झाल्याची माहिती दिली आहे.
को-विनवरील आकडेवारीनुसार, आज संध्याकाळी ५ पर्यंत दोन कोटी लोकांना लसीचा डोस देण्यात आला. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येनं लसीकरण झालं आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत शंभर कोटीहून अधिक डोस देण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.
आज दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी एक कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाला. यानंतर अवघ्या १०० मिनिटांनी हाच आकडा १.५० कोटींवर गेला. संध्याकाळी ४ वाजता लसीकरणाचा आकडा पावणे दोन कोटींच्या पुढे गेला. आज दिवसभरात अडीच कोटी डोसचा आकडा गाठला जाण्याची शक्यता आहे. कारण देशभरात १ लाख लसीकरण केंद्रावर डोस दिले जात आहेत.