India-China Flight: २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होऊ शकते. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध खूपच कटु झाले होते. सुमारे पाच वर्षांनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा उबदार होत आहेत. आता भारत सरकारने एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांना चीनला त्वरित उड्डाणे सुरू करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे.
कोरोना महामारीपूर्वी, दोन्ही देशांदरम्यान दरमहा ५३९ थेट उड्डाणे होती. ऑगस्टच्या अखेरीस होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान भारत आणि चीनमधील थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
भारताने चिनी पर्यटकांना व्हिसा पुन्हा सुरू केला
काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर एकतर्फी कर लादण्याच्या पद्धतीला दोन्ही देशांनी एकमताने विरोध केला. भारत सरकारने २४ जुलैपासून चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे.
मोदींच्या स्वागतासाठी चीन उत्सुक; ७ वर्षांनी देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा उभय देशांमधील संबंध अधिक मजबूत करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) तियानजिन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होण्याची शक्यता आहे. चीनने त्यांच्या स्वागताची तयारी चालविली आहे.
पंतप्रधान मोदी चीनला जाण्यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी जपानलाही भेट देऊ शकतात. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही एससीओ बैठकांसाठी काही दिवसांपूर्वी चीनचा दौरा केला आहे.
पंतप्रधान मोदी सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर चीनला भेट देणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये चीनचा दौरा केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, एससीओ परिषदेत २० हून अधिक देशांचे नेते सहभागी होणार आहेत.