नवी दिल्ली – चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीला सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित आहेत, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबासोबत आहोत अशी ग्वाही दिली.
या बैठकीला उद्धव ठाकरे म्हणाले की, भारताला शांतता हवी याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा स्वभाव मुळात विश्वासघातकी आहे. भारत मजबूत आहे मजबूर नाही. केंद्र सरकार चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यास सक्षम आहे. ‘आँखे निकालकर हात मे देना’ या भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चीनबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
या बैठकीला शरद पवार यांनीही भाष्य करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.
राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी
तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला, केंद्र सरकारने ही बैठक सर्वात आधी बोलवायला हवी होती, चीन आपल्या हद्दीत किती घुसलं आहे याची माहिती सरकारने द्यावी. तसेच चीनच्या या कारवाईबाबत देशाला काहीच माहिती मिळत नाही, हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश म्हणायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे असं म्हणता येणार नाही असं सांगितले.
तर या सर्वपक्षीय बैठकीतून देशात सकारात्मक आणि मजबूत संदेश जाईल. हा संदेश संपूर्ण देश सैन्यातील जवानांच्यासोबत एकत्रपणे उभा आहे. चीनमध्ये लोकशाही नाही, भारतात लोकशाही आहे. चीन जे वाटेल ते करु शकतो कारण त्याठिकाणी हुकुमशाही आहे. आपल्या देशात लोकशाही असून याठिकाणी सर्वजण मिळून मिसळून काम करतात असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगत भारताने चीनला टेलिकॉम, रेल्वे, एविएशन क्षेत्रात घुसण्यापासून रोखायला हवं अशी मागणीही केली.