India China FaceOff: शौर्याला सलाम! जसवंतसिंह रावत यांनी तब्बल ७२ तास रोखले चिनी फौजेला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 03:26 AM2020-06-22T03:26:58+5:302020-06-22T06:31:54+5:30

अरुणाचल प्रदेशातील चिनी बॉर्डर बुमला पास येथील भेटीदरम्यान जसवंतसिंह गड येथे या वीराची रोमहर्षक कहाणी कानावर पडली. जसवंतसिंह यांचे तेथे स्मारक उभारले आहे.

India China FaceOff: Jaswant Singh Rawat stopped the Chinese army for 72 hours | India China FaceOff: शौर्याला सलाम! जसवंतसिंह रावत यांनी तब्बल ७२ तास रोखले चिनी फौजेला

India China FaceOff: शौर्याला सलाम! जसवंतसिंह रावत यांनी तब्बल ७२ तास रोखले चिनी फौजेला

googlenewsNext

संदीप प्रधान/विकास मिश्रा 

चीन १९६२चे युद्ध आजही विसरणे अशक्य आहे. जसवंतसिंह रावत या वीराची मर्दुमकी आजही चीनच्या अंगावर भीतीने काटा उभा करीत असेल. जसवंतसिंह यांनी आपल्या शौर्याने आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले. केवळ २१ वर्षांच्या जसवंतसिंह यांनी चिनी सैनिकांच्या हातातील मिडियम मशीन गन खेचून तब्बल ३०० चीनी सैनिकांना यमसदनी धाडले. अरुणाचल प्रदेशातील चिनी बॉर्डर बुमला पास येथील भेटीदरम्यान जसवंतसिंह गड येथे या वीराची रोमहर्षक कहाणी कानावर पडली. जसवंतसिंह यांचे तेथे स्मारक उभारले आहे.
लडाख जवळील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत भारतीय सैनिकांची झटापट झाली. त्यामध्ये भारतीय सैनिकांनी ४२ चिनी सैनिकांना जखमी केले. अर्थात भारताचेही २० सैनिक शहीद झाले. मात्र चिनी सैनिकांवर त्वेषाने तुटून पडण्याची ही प्रेरणा जसवंतसिंह यांच्यासारख्या लढवय्यांकडून भारतीय सैनिकांना प्राप्त झाली आहे.
तवांगकडे जाणाºया मार्गावर १३ हजार ७०० फुट उंचावरील शीला पास पार केल्यावर जसवंत गड लागतो. तेथे हवेत आॅक्सिजन कमी असल्याने श्वास घ्यायला त्रास होतो. जसवंतसिंह यांची मैत्रिण शीला हिचे नाव या पहाडाला दिले असून समोरील दुसºया पहाडाचे नाव नूरानांग आहे. नूराचे घर आजही त्या पहाडावर आहे. शीला आणि नूरा या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. येथे लष्कराच्यावतीने चहाची मोफत व्यवस्था होती. तसेच हवे असल्यास गरम समोसे मिळतात. अर्थात नागमोडी वळणाच्या खडतर मार्गावरुन प्रवास केल्यावर समोसे खाण्याची इच्छा होत नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूला जसवंतसिंह यांचे स्मारक आहे. तेथील मातीच्या कणाकणात जणू वीररस मिसळला असल्याची जाणीव त्या स्मारकात पाऊल ठेवताच होते. त्यांचा पुतळा पाहिल्यावर प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावते. ज्यावेळी जसवंतसिंह यांनी हे शौर्य, मर्दुमकी गाजवली त्यावेळी त्यांनी परिधान केलेला लष्करी गणवेश, चीन्यांचे शिरकाण करण्याकरिता हाती घेतलेली शस्त्रास्त्रे तेथे ठेवली आहेत. ती पाहून अभिमानाने उर भरुन येतो.
उत्तराखंड येथील गढवाल येथील या २१ वर्षीय तरुणाने हिमालयातील या शिखरांवर येऊन जे बहाद्दूरीचे दर्शन घडवले, जी कुर्बानी दिली ती विलक्षण आहे. जसवंतसिंह यांनी ज्या मिडियम मशीन गनने चिनी सैनिकांना लोळवले ती शोकेसमध्ये पाहून मन उचंबळून येते. १९६२ मध्ये चार गढवाल रायफल्सचे शिपाई जसवंतसिंह व त्यांच्या साथीदारांकडील शस्त्रास्त्रे व दारुगोळा जेव्हा संपत आला तेव्हा त्यांना माघार घेण्याचा आदेश देण्यात आला. मात्र जसवंतसिंह यांनी माघार घेतली नाही. चिनी सैनिकांकडील एक मिडियम मशीन गन भारतीय सैनिकांवर बरसत असल्याचे लक्षात येताच लान्स नायक त्रिलोक सिंह नेगी, रायफलमन गोपालसिंह गुस्सैन आणि जसवंतसिंह हे सरपटत चीनी बंकरपाशी गेले. जेमतेम १२ मीटर अंतरावरुन त्यांनी बंकरमध्ये हातबॉम्ब फेकले. चीनचे तीन बंकर उदध्वस्त झाले. त्यामधील चिनी सैनिकांचा खात्मा झाला. सरपटत जसवंतसिंह व त्यांचे दोन साथीदार माघारी फिरले. परंतु जसवंतसिंह वगळता अन्य दोघे चिनी सैनिकांच्या गोळ््यांचे शिकार झाले. हाती आलेल्या मिडियम मशीनगनच्या सहाय्याने जसवंतसिंह यांनी चिनी सैनिकांवर गोळ््यांचा अक्षरश: वर्षाव केला. तब्बल ७२ तास त्यांनी चिनी सैनिकांना रोखून ठेवले. १७ नोव्हेंबर १९६२ रोजी जसवंतसिंह यांनी जेव्हा देह ठेवला तोपर्यंत तब्बल ३०० चिनी सैनिकांना त्यांनी टिपले होते. त्यांच्या या शौर्याकरिता त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे दोन्ही साथीदार नेगी व गुस्सैन यांनाही मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या ४ गढवाल रेजिमेंटला ‘बॅटल आॅफ आॅनर नूरानांग’ हे पदक देऊन गौरवित केले गेले. १९६२ च्या युद्धात शौर्यपदक प्राप्त करणारी ही एकमेव बटालियन होती. जसवंतसिंह यांच्या शौर्याचा आदर करण्याकरिता सरकारने त्यांची लष्करी सेवा मरणोत्तर कायम ठेवली व त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा वेतनाची रक्कम दिली. तसेच त्यांना नियमित पदोन्नती बहाल केली. जसवंतसिंह हे तवांगच्या परिसरात संत-महंतांसारखे पूजनीय आहेत. आजही या परिसराची ते रक्षा करीत असल्याची लोकांच्या मनात भावना आहे.
जसवंतसिंह व त्यांच्या दोन मैत्रिणींबाबत या परिसरात अनेक दंतकथा सांगितल्या जातात. मात्र त्यांच्या स्मारकापाशी भेटलेल्या सैनिकाने सांगितले की, चिनी सैन्याला रोखण्यात जसवंतसिंह यांना त्यांच्या मैत्रिणी नूरा आणि शीला यांनी बरीच मदत केली. तब्बल ७२ तास या तिघांनी चिनी सैन्याला रोखून धरले. अखेरीस नूराचे पिता चिनी सैनिकांच्या हाती सापडले. त्यांनी पहाडावर किती भारतीय सैनिक आहेत, अशी विचारणा त्यांच्याकडे केल्यावर त्यांनी वरती केवळ एकटे जसवंतसिंह हेच किल्ला लढवत असल्याची माहिती चिनी सैनिकांना दिली. ही माहिती मिळताच चिनी सैनिकांनी तोंडात बोटं घालणेच बाकी राहिले होते. मग मात्र त्यांनी त्वेषाने चढाई केली व जसवंतसिंह यांना ठार केले. क्रुर चिनी सैनिकांच्या हाती नूरा लागली. त्यांनी तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली. तवांगमधील स्थानिक भाषेत ‘नांग’ म्हणजे नग्न. त्यावरुनच या पहाडाला नूरानांग हे नाव पडले. नूराच्या त्याग, बलिदानाची तो पहाड साक्ष देतो.

Web Title: India China FaceOff: Jaswant Singh Rawat stopped the Chinese army for 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.